ठळक मुद्देमी कधीही व्यायाम केला नसल्याने माझी शरीरयष्ठी कशी दाखवायची असा प्रश्न मला निर्माण झाला होता. पण हे एक आव्हान म्हणून मी स्वीकारले आणि कित्येक तास जीममध्ये घाम गाळून माझे वजन कमी केले. या चित्रपटामुळे आता मी जिमला जायला लागलो आहे.

पहलवान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. त्याने याआधी मख्खी या हिंदी चित्रपटात काम केले होते तर लवकरच येणाऱ्या दबंग 3 मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. पहलवान या त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याने कित्येक किलो वजन कमी केले आहे. या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

पहलवान या चित्रपटात काम करू की नको या तू संभ्रमात होतास, हे खरे आहे का?
पहलवान या चित्रपटाबाबत मला विचारण्यात आले, त्यावेळी मी चक्क नकार दिला होता. कारण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधी मी कधीच जिममध्ये गेलो नव्हतो. त्यामुळे माझी शरीरयष्ठी पिळदार नव्हती. हा चित्रपट कुस्ती या खेळावर  आधारित असल्याने मला माझी शरीरयष्ठी दाखवणे गरजेचे होते. मी कधीही व्यायाम केला नसल्याने माझी शरीरयष्ठी कशी दाखवायची असा प्रश्न मला निर्माण झाला होता. पण हे एक आव्हान म्हणून मी स्वीकारले आणि कित्येक तास जीममध्ये घाम गाळून माझे वजन कमी केले. या चित्रपटामुळे आता मी जिमला जायला लागलो आहे.

हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला गेला आहे, याविषयी काय सांगशील?
कोणताही चित्रपट एकापेक्षा अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणे ही खूप चांगली गोष्ट आहे. सिनेमा हा लोकांच्या मनोरंजनासाठी असतो. त्यामुळे तो लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. चित्रपट अधिक भाषांमध्ये प्रदर्शित झाल्यास तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल असे मला वाटते.

पहलवान या चित्रपटात कुस्ती पाहायला मिळत आहे. यासाठी तुला काही विशेष प्रशिक्षण घ्यावे लागले का?
आजवर मी अनेक चित्रपटांमध्ये हाणामारीची दृश्य दिली आहेत. पण कुस्ती हा प्रकार वेगळा असल्याने मला त्याच्यातील बारकावे शिकायला लागले. आजवर दंगल, सुलतान यांसारखे कुस्तीवरील आधारित चित्रपट आपण पाहिले आहेत. पण पहलवान या चित्रपटाची कथा या दोन्ही चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

तू दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रींमध्ये काम केले आहेस. तुझा दोन्हीकडे काम करण्याचा अनुभव कसा होता?
दोन्ही इंडस्ट्रीत भाषा वगळता सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. त्यामुळे दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना काहीही वेगळेपण जाणवत नाही. केवळ मला हिंदीत काम करताना भाषेवर आणि विशेषतः बोलण्याची ढब, उच्चार यांवर काम करावे लागते. 

सुनील शेट्टीकडून या चित्रपटाच्या निमित्ताने काही शिकायला मिळाले का?
सुनील शेट्टीकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ते त्यांच्या फिटनेसच्याबाबतीत प्रचंड सतर्क आहेत. ते नियमितपणे जीमला जातात, डाएट करतात. मद्यपान, स्मोकिंग यांसारख्या गोष्टींपासून नेहमीच दूर राहातात. त्यांच्याकडून फिटनेसच्याबाबतीत तुम्ही जितके शिकाल तितके कमी आहे. त्यांच्याप्रमाणे तुम्ही 50 टक्के गोष्टी जरी करू शकलात तरी त्या तुम्हाला लाभदायक ठरतील.

Web Title: Kiccha Sudeep's join gym for Pailwaan movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.