ठळक मुद्देकाजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या वडिलांना माझे नाव मर्सडिज ठेवायचे होते. त्यांना हे नाव खूप आवडायचे.

आपल्या मुलांचे नाव काय ठेवायचे हे आई वडील काही वेळा मुलांच्या जन्माच्या आधीच ठरवतात. काही जणांमध्ये नाव काय ठेवायचे यावरून चांगलेच वाद देखील होतात. अभिनेत्री काजोलचे नाव तिच्या वडिलांना दुसरेच काहीतरी ठेवायचे होते. पण या नावासाठी तिच्या आईने विरोध केल्यामुळे त्यांना ते नाव ठेवता आले नाही. काजोलच्या वडिलांना तिचे नाव काय ठेवायचे होते हे कळले तर तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल...

काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक होते. तर अभिनेत्री तनुजा ही काजोलची आई आहे. काजोल आणि तनिषा अशा त्यांना दोन मुली असून काजोल त्या दोघींमध्ये मोठी आहे. काजोलच्या वडिलांना तिचे नाव काय ठेवायचे होते हे तिने हेलिकॉप्टर इला या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सांगितले होते. 

बॉलिवूड शादीज या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या वडिलांना माझे नाव मर्सडिज ठेवायचे होते. त्यांना हे नाव खूप आवडायचे. मर्सडिज कंपनीच्या मालकाने आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावरूनच या कंपनीचे नाव ठेवले होते तर मी माझ्या मुलीचे नाव मर्सडिज का ठेवू शकत नाही असा त्यांनी माझ्या आईला प्रश्न विचारला होता. हे नाव माझ्या आईला अजिबातच आवडले नव्हते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यावरून माझ्या आई वडिलांची चक्कं भांडणं झाली होती. 

काजोलने आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बेखुदी या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली. तिला बाजीगर या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने यश मिळाले. त्यानंतर तिने ये दिल्लगी, इश्क, प्यार किया तो डरना क्या, प्यार तो होना ही था, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. तिचे लग्न अभिनेता अजय देवगण सोबत झाले असून त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुले आहेत. 


Web Title: Kajol's Father, Shomu Mukherjee Had Wanted To Name Her 'Mercedes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.