ठळक मुद्देसडक या चित्रपटातील महाराणीची भूमिका चांगलीच गाजली होती. ही भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी साकारली होती. हीच भूमिका साकारण्याची इच्छा आशुतोषची आहे.

आशुतोष राणाने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने अनेक चित्रपटात साकारलेला खलनायक प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

आशुतोष नुकताच आपल्याला सिम्बा आणि धडक या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आशुतोष लवकरच प्रेक्षकांना यशराज बॅनरच्या एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप घोषित करण्यात आलेले नसले तरी या चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरू आहे. याशिवाय आशुतोष सध्या त्याच्या काही नाटकांमध्ये व्यग्र आहे. एवढेच नव्हे तर तो लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार असून एका वेबसिरिजवर काम करायला सुरुवात करणार आहे. आशुतोषने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्याला एक चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. हिंदी रश डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आशुतोषने त्याची ही इच्छा व्यक्त केली आहे.

महेश भट सध्या सडक २ या चित्रपटावर काम करत असून अनेक वर्षांनंतर ते चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांच्या पूजा भट आणि आलिया भट या दोन्ही मुली काम करत आहेत. त्या दोघींसोबतच या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सडक २ हा चित्रपट सडक या प्रसिद्ध चित्रपटाचा सिक्वल असणार असून या चित्रपटावर महेश भट प्रचंड मेहनत घेत आहेत.

सडक या चित्रपटातील महाराणीची भूमिका चांगलीच गाजली होती. ही भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी साकारली होती. हीच भूमिका साकारण्याची इच्छा आशुतोषची असल्याचे त्याने हिंदी रश डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. या भूमिकेसाठी महेश भट यांना ऑडिशन देण्याची देखील आशुतोषची तयारी आहे. 


Web Title: Ashutosh Rana wants to portray maharani character in Sadak 2
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.