Amitabh Bachchan will help maharashtra flood victims | रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत
रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

ठळक मुद्देमी पुरग्रस्तांना मदत करणार असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मी रक्कम जमा करणार आहे.

सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे. 

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशाने पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रातून जगभर पसरणारे बॉलिवूड कुठं गेलंय? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे. लानत है उनपर, जिनके पास दानत नही है.... असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून बॉलिवूडला चांगलेच फटकारले होते. पण आता बॉलिवूडमधील मंडळी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावली आहेत असे म्हणावे लागेल. 

काल रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली होती. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला होता आणि आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे त्यांनी नुकतेच कौन बनेगा करोडपतीच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी पुरग्रस्तांना मदत करणार असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मी रक्कम जमा करणार असून या संकटात लोकांनी देखील मोठ्या प्रमाणे आपल्या बांधवांना मदत केली पाहिजे असे मी या माध्यमाद्वारे लोकांना सांगत आहे. सोशल मीडियावरून अधिकाधिक लोकांना आवाहन कसे करता येईल, याबाबत माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. 

तसेच या पत्रकार परिषदेत अमिताभ म्हणाले की, बॉलिवूडमधील अनेक कलाकार अशा संकटाच्या काळात मदत करतात, पण त्याबाबत ते न बोलणेच पसंत करतात. मी देखील त्या कलाकारांपैकीच एक आहे.
 


Web Title: Amitabh Bachchan will help maharashtra flood victims
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.