Karnataka Election 2018 दलित, ओबीसी जाती नेमकं काय करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 02:00 PM2018-05-10T14:00:00+5:302018-05-10T14:00:00+5:30

कर्नाटकच्या महासंग्रामात जात आणि धर्माला खूपच जास्त महत्व आले आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष एका जातीचे नेतृत्व करताना तसेच मतेही मिळवताना दिसत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत रविवारी मते देताना मतदार नेमके काय करतील त्याचे जातींच्या समीकरणांच्या आधारे केलेले विश्लेषण.

Karnataka Election 2018 What will be voting trend of SC, OBC Castes ? | Karnataka Election 2018 दलित, ओबीसी जाती नेमकं काय करणार ?

Karnataka Election 2018 दलित, ओबीसी जाती नेमकं काय करणार ?

googlenewsNext

भाऊसाहेब आजबे

जात हा भारतीय राजकारणातला निर्णायक स्वरूपाचा  घटक राहिलेला आहे. कर्नाटक निवडणूकही याला अपवाद नाही. रजनी कोठारी यांनी जात आणि राजकारण यामधील आंतरसंबधाचे दोन टप्पे सांगितले होते . त्यातील दुसरा टप्पा हा प्रस्थापित व उदयोन्मुख जातींच्या संघर्षाचा आहे . या टप्प्यात जातींमध्ये गट पडतात . अशा विविध जातीतील गटांची तसेच जातींची मोट बांधली जाती. असा प्रयत्न भाजप , जनता दल (धर्मनिरपेक्ष ) म्हणजेच जेडीएस, आणि  कॉंग्रेस कडून या कर्नाटक निवडणुकीत होत असताना दिसत आहे. लिंगायत या परंपरागत मतबँकेच्या पलीकडे जाऊन कर्नाटक मधील मादिगा  दलितांना भाजप साद घालत आहे. जेडीएस चे अस्तित्व वोक्कालीगा या जातीच्या पाठिंब्याच्या बळावर टिकून आहे.बिहार मधे राष्ट्रीय जनता दल किंवा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष यांची प्रतिमा जशी यादवांचा पक्ष अशी झाली आहे तशीच कर्नाटकात जेडीएस ची वोक्कालिगा समाजाचा पक्ष अशी आहे.  त्यामुळेच जेडीएस ,बहुजन समाज पक्ष तसेच एमआयएम या पक्षांचा पाठींबा मिळवत  दलित व मुस्लीम मतदार आपल्याकडे वळवू पाहत आहे. काँग्रेस अहिंदा म्हणजेच ओबीसी ,मुस्लीम आणि दलित या परंपरागत  मतबँकेसह प्रामुख्याने लिंगायत मतबँकेला खिंडार पाडू इच्छिते. तिन्हीही पक्षांचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार परंपरागत पाठींबा देणाऱ्या जातींचे आहेत. सिद्धरामय्या हे जरी कुरुबा या ओबीसी जातीचे असले तरी ते अहिंदा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे . स्वतःची मतबँक टिकवत इतरांच्या मतबँकेला तडा देण्यात कोणाला किती यश येते यावर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल हे निश्चित .

विकासाचे राजकारण

विकासाचे राजकारण  या निवडणुकीत मतदारांसाठी बिनमहत्वाचे आहे असे नाही. पण त्याचे वेगवेगळ्या समूहांसाठी महत्व वेगवेगळे आहे. सिद्धरामय्या सरकारने विभिन्न भाग्य योजना सुरु केल्या . इंदिरा कॅन्टिन तर सर्वात लोकप्रिय .  अशा योजनांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. बहुतेक नागरिक या योजनांसाठी सिद्धरामय्या यांचे कौतुक हि करतात . त्यामुळे त्यांची  परंपरागत मतबँक त्यांच्या पाठीमागे अढळपणे पाठीशी उभी राहण्याची शक्यता अधिक .  परंतु कॉंग्रेस’ला परंपरागत मतदान न करणाऱ्या मतदारांनी काँग्रेसला मतदान करावे इतके ठोस हे कारण त्यांना वाटेलच असे नव्हे. शिवाय यातील बहुतेक योजनांचा लाभ निम्न आणि कनिष्ठ मध्यम आर्थिक स्तरातील लोकांना झाला आहे. उच्च मध्यम व उच्च आर्थिक  स्तरातील नागरिक या विकास योजनांचे थेट लाभार्थी नसल्यामुळे त्यांच्यासाठी मतदान करताना सामजिक न्यायाची कामे निर्णायक असतीलच  असे नव्हे . विकास कामे तसेच भ्रष्टाचार यासंदर्भात सिध्दरामयांना  खिंडीत पकडता येत नसल्यामुळे धार्मिक धृवीकरणाचा जुना मंत्र वापरत भाजप लिंगायत मते टिकवू पाहत आहे. परंतु याशिवाय सिद्धरामय्या यांची प्रतिमा हि जनमानसात अत्यंत सकारात्मक आहे. आणि विकास राजकारणाच्या संदर्भात विरोधी पक्षांना लाभदायक ठरेल अशी ‘अँटी इन्कम्बसी’  नसणे हि कॉंग्रेससाठी जमेची बाजू आहे. 

लिंगायत मतबँक

लिंगायतांचे प्रमाण १५ ते १७% आहे . निवडणुकीच्या तोंडावर लिंगायतांना वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची खेळी काँग्रेस ने खेळली . वेगळ्या धर्माला भाजप चा उघड विरोध आहे.  त्यामुळे वेगळ्या धर्माचा दर्जा हवा असणारे लिंगायत मतदार आपल्याकडे वळतील अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. वेगळ्या धर्माला बऱ्याच मठाधीपतींचा पाठींबा आहे. माते महादेवी (महिला असणाऱ्या एकमेव मठाधिपती) यांनी सिद्धरामय्या यांना उघड पाठींबा दिला आहे. वेगळा धर्माच्या मागणीला सिद्धरामय्या यांनी दिलेली  मान्यता  तसेच ते सामाजिक न्यायाचा आणि सौहार्दाचा अजेंडा राबवतात या दोन कारणांसाठी सिद्धरामयांच्या पाठीशी माते महादेवी उभ्या राहिल्या आहेत. या स्वरुपाचा पाठींबा कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढविणारा  आहे . परंतु या खेळीने  काँग्रेस च्या पारड्यात कितपत मते पडतील याविषयी शंका आहे. कारण हिंदुत्वाच्या प्रभावाखाली आलेला लिंगायतांमधील एक वर्ग वेगळ्या धर्माला विरोध करत आहे. शिवाय वेगळ्या धर्माला समर्थन देणाऱ्या मठाधिपतींची भूमिका राजकीय निवड करताना लिंगायत मतदार प्रमाण मानतीलच असे नाही . दुसरी अडचण अशी कि आपले मत भाविकांपर्यंत पोचविण्याची पर्यायी साधने या मठाधिपतींकडे नाहीत . किमान १५-२० वर्षे आपले हितसंबंध सांभाळणाऱ्या पक्षाला डावलून दुसऱ्या पक्षाला ठोस कारण असल्याशिवाय मतदार मतदान करत नाहीत . कर्नाटकातलील लिंगायतांप्रमाणे . गुजरातमधे पाटीदार समाज भाजपची परंपरागतमतबँक आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात लक्षणीय संख्येने पाटीदार मतदार भाजपविरोधी गेले . यामागे  आरक्षणाची मागणी मान्य न होणे , पाटीदार आंदोलकांविरुध्द हिंसा , हार्दिक पटेल पाटीदार युवकांचा आयकॉन होणे अशी ठोस कारणे होती . आणि तरीही पाटीदार समाजाचे संपूर्ण ध्रुवीकरण झाले नव्हते . कर्नाटकमधे वेगळ्या धर्माच्या मागणीला पाटीदारांच्या आरक्षण मागणीसारखे व्यापक जनसमर्थन नाही. आणि ज्यांचे समर्थन आहे त्यांना वेगळा धर्म हे भाजपविरोधी मतदान करण्यासाठी ठोस कारण वाटेल याची शाश्वती नाही. तसेच बी एस येडीयुरप्पा यांना लिंगायत समाजाकडून आपला नेता म्हणून जशी मान्यता आहे तशी आणि तेवढी कॉंग्रेस च्या एम बी पाटील सारख्या लिंगायत नेत्यांना नाही. २०१३ मधे कर्नाटक जनता पक्ष या  येडियुरप्पांच्या पक्षाला १०% मते मिळाली होती .  आता तर  येडीयुरप्पा हे भाजप  कडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत . त्यामुळे त्यांना डावलून कॉंग्रेसला मतदान स्थानिक उमेदवार प्रभावी असेल तरच होऊ शकते. 

 

वोक्कालिगा मतबँक

वोक्कालिगा मतदारांची (१२ ते १५ % वाटा)  जुने म्हैसूर आणि बंगळूरू ग्रामीण या भागांत बहुसंख्या आहे.  काँग्रेसच्या डी के शिवकुमार या मातब्बर नेत्याची बंगळूरू ग्रामीणवर पकड आहे. परंतु या पट्ट्यात जेडीएस चे वर्चस्व आहे. या भागात मुख्य स्पर्धा जेडीएस व काँग्रेस यांच्यामधेच आहे. जेडीएस केवळ देवेगौडा कुटुंब व नातेवाईककेन्द्री आहे अशी तक्रार असणारे वोक्कालिगा आणि काँग्रेसच्या डी के शिवकुमार यासारख्या  मातब्बर नेत्याच्या प्रभावाखाली असणारे वोक्कालिगा मतदार वगळले तर इतर बहुसंख्य मतदारांसाठी जेडीएस नैसर्गिक निवड आहे. त्यात  सिद्धरामय्या एकेकाळी जेडीएस मध्ये होते. देवेगौडांची साथ सोडून ते कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांच्याविरुध्द वैयक्तिक रागही काही प्रमाणात वोक्कालिगा समाजात आहे . तसेच त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास जेडीएस किंगमेकर होईल. या शक्यतेमुळे वोक्कालिगा मतदार जेडीएसच्यामागे संघटीत होताना दिसत आहेत. अशा स्थितीत भाजप व जेडीएस एकत्र येऊ शकतात . त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे चाहते असणारे तरुण वोक्कालिगा मतदार जेडीएसचा हिरीरीने प्रचार करताना दिसतात .

मुस्लीम मतबँक

परंतु भाजप व जेडीएस एकत्र येण्याच्या शक्यतेचा जेडीएसला फटकाही बसू शकतो. मुस्लीम मतबँक १३% असून ती काँग्रेस व जेडीएस मध्ये विभाजित आहे.  भाजप व जेडीएस जवळीकीची शक्यता या मतबँकेला काँग्रेसमागे संघटीत करू शकते. याचमुळे कॉंग्रेसकडून जेडीएस भाजपची बी टीम असल्याचा प्रचार केला जातो. तर देवेगौडांकडून जेडीएस भाजप बरोबर कधीच आघाडी करणार नाही असा दावा केला जातो.

जमीर अहमद खान हे जेडीएसचे प्रभावी मुस्लीम नेते इतर एका मुस्लीम आमदारासह कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. ही काँग्रेसच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. तर एमआयएमचा पाठींबा जरी जेडीएसला मिळाला असला तरी त्याचा मतांसाठी किती फायदा होईल याविषयी शंका आहे. त्यामुळे मुस्लीम मते विभाजित होतात कि कॉंग्रेसमागे त्यांचे ध्रुवीकरण होते यातून काँग्रेस सत्तेपर्यंत पोचेल कि नाही हे ठरेल हे निश्चित.

दलित व ओबीसी मतबँक

कर्नाटक मध्ये १०१ दलित जाती असून त्यांचे प्रमाण १७% आहे. त्या ‘उजवा हात’ आणि ‘डावा हात’ अशा दोन गटांत विभागलेल्या आहेत .  उजवा हात समजल्या जाणाऱ्या होलायाससारख्या जाती कॉंग्रेसच्या परंपरागत समर्थक आहेत तर डावा हात समजल्या जाणाऱ्या जाती आधी जेडीएस व अलीकडे भाजपचेही समर्थन करताना दिसतात . बसपाचा पाठींबा मिळवत जेडीएस आपली मते टिकवू इच्छित आहे. तर भाजपचा मादिगांना आपल्यामागे संघटीत करण्याचा प्रयत्न आहे.

वोक्कालीगा, कुरुबा (८%)  आणि लिंगायतांमधील ओबीसी प्रवर्ग वगळता इतर छोट्या २०४ जाती ओबीसी (२४%) मध्ये येतात . कमी मताधिक्याने उमेदवार निवडल्या जाणाऱ्या काही भागांमाधे या छोट्या जातींचे महत्व टिकून आहे . उदा इडीगा हे  दक्षिण कन्नड, शिमोगा यासारख्या मतदारसंघामध्ये प्रभावी आहेततर नेकाराज हे उत्तर कर्नाटकातील काही भागांत प्रभावी आहेत. या छोट्या जातींचे निवडणुकीतील वर्तन हे स्थळकाळानुसार भिन्न राहिले आहे . हिंदुत्वाने यातील काही जातींवर पकड मिळवायला सुरुवात केली आहे . तर सिद्धरामय्यांची  प्रतिमा अहिंदा नेता अशी आहे. अटीतटीच्या निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात या छोट्या ओबीसी जातींची मते निर्णायक ठरतील यात शंका नाही.

कोणत्याही निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची कामगिरी , नेतृत्व , स्थानिक उमेदवार , आश्वासने यासारखे विविध घटक प्रभाव पाडत असतात . याव्यतिरिक्त महत्वाचा घटक जात आणि धर्मही आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत हा घटक निर्णायक असेल. प्रमुख जाती आणि त्याअंतर्गत विविधगट यांच्या वर्तनाच्या विविध शक्यता आहे. त्यातील समीकरणे कशी जुळतात याआधारे काँग्रेसची निसटत्या बहुमतासह पुन्हा एकदा सत्ता किंवा त्रिशंकू अशा दोन शक्यता दिसतात .


(लेखक राजकीय विश्लेषक असून कर्नाटकचा दौरा केल्यानंतर त्यांनी हा लेख खास www.lokmat.com साठी लिहिला आहे)

Web Title: Karnataka Election 2018 What will be voting trend of SC, OBC Castes ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.