BLOG: उपमुख्यमंत्री होऊन सुनेत्रा पवारांचं खरंच चुकलं का?

By कोमल खांबे | Updated: February 1, 2026 18:12 IST2026-02-01T15:20:20+5:302026-02-01T18:12:42+5:30

माझा पती फक्त कुटुंबाचा नव्हता. तो बारामतीचा लेक आणि संपूर्ण महाराष्ट्राचा "दादा" होता. त्यांच्या जाण्याने फक्त माझं कुटुंब पोरके नाही झालं तर या महाराष्ट्रानेही कर्ता पुरुष गमावला... हा विचार दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात आला असेल आणि पदर खोचून ती उभी राहिली असेल. 

BLOG deputy cm sunetra pawar we salute your decision after ajit pawar death | BLOG: उपमुख्यमंत्री होऊन सुनेत्रा पवारांचं खरंच चुकलं का?

BLOG: उपमुख्यमंत्री होऊन सुनेत्रा पवारांचं खरंच चुकलं का?

सुनेत्रा पवार तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनेकांना पोटशूळ उठला. एवढ्या घाईत शपथ घ्यायची गरज होती का? सत्तेची खुर्ची जास्त मोठी झाली..., तेरावं होईपर्यंत तरी थांबायचं होतं... जे लोक अजित दादांचं निधन झालं म्हणून हळहळ व्यक्त करत होते...आम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहोत म्हणून आश्वासन देत होते... त्यापैकीच काहींच हे म्हणणं... आपल्याकडे लोकांना मतं द्यायची इतकी घाई असते की कधी कधी आपण काय बोलतोय याचा जराही विचार केला जात नाही.

एक माऊली जिचा पती २ दिवसांपूर्वीच अचानक घडलेल्या अपघातात गेला. त्या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला नसेल का? कोणतीही पूर्वकल्पना न देता साथीदार अर्ध्यावरच सोडून गेला... घरातला कर्ता पुरुष गेल्यावर आपलं पुढे कसं होणार? मुलांचं काय होणार? घर कसं सांभाळणार? असे असंख्य प्रश्न त्या माऊलीसमोर उभे राहिले नसतील का? पण माझा पती फक्त कुटुंबाचा नव्हता... तो बारामतीचा लेक आणि संपूर्ण महाराष्ट्राचा "दादा" होता... त्यांच्या जाण्याने फक्त माझं कुटुंब पोरके नाही झालं तर या महाराष्ट्रानेही कर्ता पुरुष गमावला... हा विचार दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात आला असेल आणि पदर खोचून ती उभी राहिली असेल. 

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मिळालेला मान, ही आनंदाची गोष्ट... पण शोकसागरात बुडालेल्या सुनेत्रा पवारांच्या चेहऱ्यावर शपथ घेताना ना दुःखाची किनार दिसली ना चिंतेची लकेर... कारण हे पद म्हणजे निव्वळ त्यांच्यासाठी जबाबदारी आहे. हे त्यांच्या मर्जीने झालं का? यासाठी त्या तयार होत्या का? या प्रश्नांना काहीच अर्थ उरत नाही... कारण अजित दादांनंतर त्यांच्याकडे आशेने पाहणाऱ्या महाराष्ट्रासाठी, अजित दादांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांना दुःख बाजूला ठेवून मनावर दगड ठेवून हे पाऊल उचलावं लागलं असेल. नवरा गेल्यानंतर ३ दिवसात त्याच्याच खुर्चीवर बसायला कोणत्या बाईला आनंद होईल? सुनेत्रा पवारांनाही नक्कीच झाला नसेल...पण त्यांच्यापुढे पर्याय नव्हता कदाचित... नवऱ्याच्या अस्थी सोडून लगेचच कामाला लागलेल्या त्या माऊलीच्या मनात कोणतं वादळ उठलं असेल याची आपल्यापैकी कोणीही कल्पना करू शकत नाही. 

"मी कामाचा माणूस आहे...उठा आणि कामाला लागा", असं अजित पवार सतत म्हणायचे. मग ते गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना, पक्षाला चेहरा नसताना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत कामाला लागल्या असतील तर त्यात गैर काय? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शुभेच्छा. हे जग कधीच कोणासाठी थांबत नाही.. तिसरी घंटा वाजली की कलाकाराला कुठल्याही परिस्थितीत स्टेजवर यावच लागतं. ते म्हणतात ना शो मस्ट गो ऑन... तसंच राजकारणाच्या पटलावरच हुकुमी एक्का गेला तरी खेळ अर्ध्यावर सोडून चालत नाही...

राजकीय कुटुंबातल्या, राजघराण्यातल्या बायका किती धीराच्या असतात, हे सुनेत्रा पवार यांच्याकडे बघून कळतं. त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजे केवळ त्यांची फॅमिली नसते तर कुटुंब म्हणजे संपूर्ण राज्य असतं. आपल्याला किमान या दु:खातून सावरायला १२ दिवस मिळतात. पण, या अशा घराणातल्या बायकांना तितकाही वेळ मिळत नाही. एकीकडे नवरा अकाली गेल्याचं दु:ख पचवून त्या त्यांच्या जबाबदाऱ्यांसाठी लगेचच उभं राहतात. कारण, हा कुटुंबाचा, कार्यकर्त्यांचा डोलारा त्यांना ढळू द्यायचा नसतो.

Web Title: BLOG deputy cm sunetra pawar we salute your decision after ajit pawar death