जन्म-मृत्यूचा फेरा : तीर्थ घेतल्यावरच सुतक सुटते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 04:12 PM2020-02-18T16:12:32+5:302020-02-18T16:29:24+5:30

खरे तर, दोन्ही घटना निधनाच्या. म्हणजे दु:खदच. सुतक असताना लग्न, बारसे, वास्तुशांत किंवा तत्सम विधी करू नयेत, त्यासाठी आडकाठी आणली तर एकवेळ समजू शकते. कारण कुटुंबात किंवा भावकीमध्ये दु:खाची घटना घडली असताना शुभकार्ये करू नयेत, हा विचार कुणालाही मान्य असणारा आहे; परंतु तीर्थ घेतल्याशिवाय सुतक सुटत नाही व तीर्थ पुन्हा सुतकात घेता येत नाही, हे विचारांचे मागासलेपण आता समाजाने टाकून दिले पाहिजे.

Birth and death rounds: Do you get relief after taking pilgrimage? | जन्म-मृत्यूचा फेरा : तीर्थ घेतल्यावरच सुतक सुटते का?

जन्म-मृत्यूचा फेरा : तीर्थ घेतल्यावरच सुतक सुटते का?

googlenewsNext
ठळक मुद्देजन्म-मृत्यूचा फेरा तीर्थ घेतल्यावरच सुतक सुटते का?

घटना मागच्या पंधरवड्यातील. कागल तालुक्यातील एका नातेवाइकाचे निधन झाले. त्यांचे मूळ गाव एक आणि नोकरीच्या निमित्ताने आता स्थायिक कागलमध्ये. त्यामुळे अंत्यसंस्कारांचा विधी गावी झाला. अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन झाले. सारे कुटुंबीय गावीच राहिले. दोन्ही मुले कर्ती; परंतु वडिलांचेच निधन झाल्याने त्यांनी सुतक पाळले.

बाराव्याचा दिवस ठरला. त्याच्याअगोदर दहाव्याचाही विधी करून घेतला आणि अचानक त्यांच्या भावकीतील एका १०३ वर्षे पार केलेल्या वयोवृद्ध महिलेचे निधन झाले. त्यामुळे आमच्या नातेवाइकांच्या बाराव्याचा विधी पुढे ढकलण्यात आला. त्याचे कारण काय, तर सुतकात तीर्थ घेता येत नाही. म्हणजे दहाव्या दिवशीचा विधी झाल्यानंतर हे तीर्थ घेतल्यानंतर सुतक संपुष्टात आले, अशी भावना त्यामागे आहे; परंतु सुतकात हे तीर्थ घेता येत नाही, असा प्रघात आहे. त्यामुळे बाराव्याचा विधी पुढे गेला. साऱ्या कुटुंबास त्या गावात राहावे लागले.

खरे तर, दोन्ही घटना निधनाच्या. म्हणजे दु:खदच. सुतक असताना लग्न, बारसे, वास्तुशांत किंवा तत्सम विधी करू नयेत, त्यासाठी आडकाठी आणली तर एकवेळ समजू शकते. कारण कुटुंबात किंवा भावकीमध्ये दु:खाची घटना घडली असताना शुभकार्ये करू नयेत, हा विचार कुणालाही मान्य असणारा आहे; परंतु तीर्थ घेतल्याशिवाय सुतक सुटत नाही व तीर्थ पुन्हा सुतकात घेता येत नाही, हे विचारांचे मागासलेपण आता समाजाने टाकून दिले पाहिजे.

आपल्या समाजात अशा काही प्रथा, परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहेत. त्यामागचे तत्त्वज्ञान, विचार, शास्त्र काय, हे लोकांना फारसे माहीत नाही; परंतु परंपरेने, प्रथेने काही गोष्टी चालत आल्या आहेत, म्हणून त्या आजही तशाच पुढे सुरू आहेत. अशा काही प्रथा, परंपरांच्या बेड्या आजही समाजाच्या पायांत रुतून बसल्या आहेत. अशा बेड्यांचा कच किमान थोडा सैल व्हावा, समाजाने प्रागतिक विचार करावा, याच हेतूने लोकमतने हा विषय हातात घेतला आहे. तसा लग्न, मृत्यूपासून सर्वच समाजांतील विविध धार्मिक प्रथा, परंपरांबद्दल आपला समाज कमालीचा संवेदनशील आहे. त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे. त्यात बदल करायला तो फारसा उत्सुक नाही.

कोणी बदल करतो म्हटले, तर त्यास कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक तयार नसतात. त्याबद्दल लोकांच्या भावना किती तीव्र असतात, याचा अनुभव मी स्वत:ही घेतला आहे. ही गोष्ट साधारणत: १९९३ ची. त्यावेळी मी शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्रविद्येचे शिक्षण घेत होतो. पत्रकारिता मनात मूळ धरू लागली होती. त्यादरम्यान मी ह्यबाराव्याची प्रथा बंद करा, असे आवाहन करणारे वाचकांचे पत्र वृत्तपत्रांत लिहिले. ते वाचून फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे दादासाहेब जगताप यांनी व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले.

चांगला विचार मांडला असल्याचे त्यांचे म्हणणे होते; परंतु माझ्या घरच्या पत्त्यावर शिरोळ तालुक्यातून व अन्य काही गावांतूनही पोस्टकार्डे आली. त्यांमध्ये लोकांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.

बाराव्याची प्रथा बंद करा म्हणतोस; तू आभाळातून पडला आहेस का? तुला कोण आई-बाबा नाहीत का? अशी विचारणा एका शेतकऱ्याने केली होती. कुटुंबात कुणाचेही निधन झाल्यास त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशा दु:खाच्या प्रसंगी नातलग, पै-पाहुणे, मित्रमंडळी भेटायला येतात. त्यातून दु:खभार हलका होता. सांत्वन केल्याने मानसिक आधार मिळतो. नातेसंबंध दृढ होतात. त्यासाठी ही प्रथा आहे. ती तुम्ही बंद करायची भाषा करता, हे बरोबर नाही, असा त्यामागे त्यांचा रोख होता.

या प्रथेमागील भावना फक्त सांत्वनापुरतीच मर्यादित नाही. त्यामागे आणखीही काही शास्त्रीय कारणे आहेत. पूर्वी बहुतांश लोकांचा मृत्यू हा विविध संसर्गजन्य आजार व साथीच्या रोगाने होत असे. प्लेगने सारे कुटुंबच्या कुटुंब संपून जात असे. त्यामुळे अशा संसर्गाचा इतर समाजाला त्रास होऊ नये यासाठी ज्यांच्या घरात मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाला किमान दहा-बारा दिवस अन्य समाजांपासून बाजूला ठेवणे हे महत्त्वाचे कारण या प्रथेमागे आहे.

दहाव्यादिवशी खवर करून केस भादरून घेतले जातात; कारण केस भादरून घेतलेला हा त्या व्यक्तीचा मुलगा किंवा भाऊ असतो. तोच त्या निधन झालेल्या व्यक्तीसोबत दवाखान्यात सेवेसाठी राहिलेला असतो. त्यामुळे त्याला संसर्गबाधा होऊ नये, असा विचार त्यामागे होता व आहे. घर सारविणे, भांडीकुंडी धुणे, अंथरूण धुऊन काढणे यामागेही तेच कारण आहे. खरे तर हा आरोग्याच्या दृष्टीने केलेला विचार आहे. पूर्वी निधन झाल्यावर त्याची माहिती देण्याची जलद व्यवस्था नव्हती.

गावातील एखादी व्यक्ती किंवा जवळचे कोणीतरी गावोगावी पायी अथवा बैलगाडीतून जाऊन निधनाची वार्ता सांगून येत असत. त्यांना यायला जास्त कालावधी लागत असे. त्यामुळे पै-पाहुण्यांना निधनाची माहिती समजल्यावर ते यायचे झाल्यास काही दिवसांचा कालावधी असावा व तोपर्यंत त्या कुटुंबातील लोकांनी घरीच थांबावे, म्हणजे लांबून आलेल्या पै-पाहुण्यांची भेट घडून येईल, असाही विचार बारा दिवस घरी बसून राहण्यामागे त्यावेळी आपल्या पूर्वजांनी केल्याच्या नोंदी आढळतात.

-विश्र्वास पाटील

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीप्रमुख आहेत. संपर्क : ९७६३७२५२४४)

Web Title: Birth and death rounds: Do you get relief after taking pilgrimage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.