This year, there will be 1 lakh tonnes of sugar left | यंदा १६० लाख टन साखर शिल्लक राहणार
यंदा १६० लाख टन साखर शिल्लक राहणार

चंद्रकांत कित्तुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखरेचा नवा हंगाम सुरू होत असताना देशात १४५ लाख टन साखर शिल्लक असेल असे प्रत्येकजण सांगत असला तरी प्रत्यक्षात ही साखर १६० लाख टन इतकी असेल, असा निष्कर्ष जगजीवन केशवजी अ‍ॅन्ड कंपनी या खासगी फर्मने सर्वेक्षणाद्वारे काढला आहे. त्यामुळे नव्या हंगामातही अतिरिक्त साखरेची डोकेदुखी कायम राहणार आहे.
चालू हंगामात साखरेचे ३३० लाख टन इतके उच्चांकी उत्पादन झाले आहे. संपूर्ण हंगामात साखरेचे दर ३१०० ते ३२०० रुपये क्विंटलच्या आसपासच राहिले आहेत. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये निश्चित केला असता तर ते यापेक्षाही खाली आले असते. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर पडल्याने ही परिस्थिती आहे. देशाची साखरेची गरज २६० लाख टन इतकी आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी ५० लाख टन साखरेचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यासाठी सरकारने निर्यात अनुदानही दिले आहे तरीही या हंग्मात ३८ लाख टन साखरच निर्यात होत आहे.
आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामात २८० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ४२५ लाख टन साखर उपलब्ध होईल. त्यातील देशाला लागणारी २६० लाख टन कमी केली असता १६५ लाख टन साखर शिल्लक राहते. त्यामुळे नव्या हंगामासाठी ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ते गाठता यावे यासाठी निर्यात अनुदानही केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यामुळे देशातील अतिरिक्त साखर कमी होऊन साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे. नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जगजीवन केशवजी अ‍ॅन्ड कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार या हंगामाअखेर देशात १६० लाख टन साखर शिल्लक राहील. नव्या हंगामात किमान २६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले तरी ४२० लाख टन साखर उपलब्ध होणार आहे.
त्यातील देशांतर्गत उपभोग २६० लाख टन आणि निर्यातीचे लक्ष्य १०० टक्के गाठले तर ६० लाख टन अशी ३२० लाख टन साखर कमी होऊन २०२०-२१ च्या हंगामासाठी १०० लाख टन साखर शिल्लक आणि बाजारात असलेली २० लाख टन अशी १२० लाख टन साखर शिल्लक असेल. २०२०-२१ च्या हंगामातील उत्पादनाचा अंदाज ३०० लाख टनाचा गृहीत धरला तरी ४२० लाख टन साखर उपलब्ध असेल आणि अतिरिक्त साखरेचा प्रश्नही कायम असेल, असे या फर्मचे चालक प्रफुल्ल विठलानी यांनी सांगितले.

निर्यातीला संधी
आगामी हंगामात जगभरातील साखर उत्पादन ५० लाख टनांनी घटणार आहे. त्यामुळे भारताला आपली अतिरिक्त साखर आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्याला चांगली संधी असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: This year, there will be 1 lakh tonnes of sugar left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.