Navratri : मी दुर्गा : कोरोनाला हरवल्याचे समाधान लाखमोलाचे : ज्योती तावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:20 AM2020-10-20T10:20:26+5:302020-10-20T15:59:15+5:30

Navratri2020, asha worker, kolhapurnews, coronavirus आशा म्हणून काम करणाऱ्या ज्योती तावरे या गेले सहा महिने कोरोनाशी चार हात करीत आहेत. कुटुंबाची सुरक्षा दावणीला लावून, जिवावर उदार होऊन त्यांनी एकही सुट्टी न घेता रात्रंदिवस काम केले. अनेकांना कोरोना होण्यापासून वाचवले, म्हणूनच या जीवघेण्या कोविडच्या काळात त्या खऱ्या अर्थाने दुर्गा ठरतात.

Navratri: I am Durga: Satisfaction of losing Corona is worth lakhs: Jyoti Taware, hopeful staff | Navratri : मी दुर्गा : कोरोनाला हरवल्याचे समाधान लाखमोलाचे : ज्योती तावरे

Navratri : मी दुर्गा : कोरोनाला हरवल्याचे समाधान लाखमोलाचे : ज्योती तावरे

Next
ठळक मुद्देNavratri : मी दुर्गा : ज्योती तावरेआशा म्हणून काम करताना कोरोनाला हरवल्याचे समाधान लाखमोलाचे

शा म्हणून काम करणाऱ्या ज्योती तावरे या गेले सहा महिने कोरोनाशी चार हात करीत आहेत. समाजाने हेटाळणी केली, हाकलून लावले तरी त्यांनी जबाबदारी टाळली नाही. कुटुंबाची सुरक्षा दावणीला लावून, जिवावर उदार होऊन त्यांनी एकही सुट्टी न घेता रात्रंदिवस काम केले.

अनेकांना कोरोना होण्यापासून वाचवले, म्हणूनच या जीवघेण्या कोविडच्या काळात त्या खऱ्या अर्थाने दुर्गा ठरतात. त्यांना बोलते केले असता, त्यांनी कोविड काळातील बऱ्यावाईट अनुभवांची जंत्रीच मांडली. पण हे करताना कोणतीही खंत नाही; उलट कोरोनाला हरवल्याचे समाधान लाखमोलाचे असल्याचे त्या आवर्जून सांगतात.

ज्योती तावरे या कळंबा येथे राहतात. त्यांचे माहेर राधानगरीतील कपिलेश्वर; तर सासर शाहूवाडीतील विरळे. पतींच्या नोकरीमुळे त्या कोल्हापुरात आल्या. लहानपणापासून समाजसेवेची आवड. कुणाच्याही मदतीला धावून जाण्याची त्यांची प्रवृत्ती लग्नानंतरही कमी झाली नाही. समाजसेवेची आवडही जपता येईल आणि घरालाही हातभार लागेल म्हणून आशा कर्मचारी म्हणून काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

२०१६ पासून त्या आशा म्हणून कोल्हापूर शहरात काम करीत आहेत. संघटन कौशल्यामुळे त्यांच्यावर ह्यआशाह्ण कर्मचारी संघटनेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. हे काम सुरू असताना मार्चमध्ये कोरोना आणि लॉकडाऊन सुरू झाला. खऱ्या अर्थाने ह्यआशांह्णचे काम काय असते याची जाणीव समाजाला झाली.
या काळात सर्वेक्षणाचे काम करीत असताना रोजच मरण समोर दिसायचे, रात्ररात्रभर झोप लागायची नाही.

घरात दहावी झालेली मुलगी, सातवीला असलेला मुलगा आणि पती असत. त्यांचे चेहरे समोर दिसायचे. सर्वेक्षण करीत असताना पॉझिटिव्ह रुग्णही सापडायचे, त्यांच्या थेट संपर्कात यायचे; पण जीव घट्ट करून त्यांचा सामना करीत असे, हे सांगताना त्यांचा कंठ दाटून येतो.

कोरोनाच्या भीतीपेक्षा समाजाचे वागणेच जास्त क्लेशदायी होते. हे सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. मला स्वत:ला जरा कणकण जाणवत होती, म्हणून डॉक्टरांकडे गेले, तर त्यांनी ह्यआशाह्ण म्हणून काम करते म्हटल्यावर तपासणीसाठी हात लावायलाही नकार दिला.

ज्या समाजासाठी आम्ही राबतो तोच आपली कदर करीत नाही याचे खूप वाईट वाटले. सर्वेक्षणाचे काम करतानाही माहिती विचारायला गेल्यावर लोक आमच्या अंगावर लोक धावून यायचे, हाकलून लावायचे, तोंडावरच गेटचे दार बंद करायचे, हे आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते; पण समाजाची सेवा घेण्याचे व्रत स्वीकारले आहे म्हटल्यावर कौतुकापेक्षा अवहेलना वाट्याला येणारच, हे गृहीत धरून वाटचाल सुरू ठेवल्याचे त्या सांगतात.
 


रात्री घरी परतल्यावर कुटुंबीयांना भेटताना दक्षता घ्यावी लागायची. दारात पाण्याची बादली आणि साबण ठेवलेला असायचा. ते पाहून वाटायचे की, आपण कुणाच्या तरी अंत्यविधीलाच जाऊन आलो आहोत. समाजाने आम्हांला सुरुवातीला जवळ केले नाही; पण कुटुंबीयांनी कधी दूर लोटले नाही. त्यांचे प्रेम आणि सहकार्यामुळेच मी आजवरची लढाई जिंकू शकले.
ज्योती तावरे, 

आशा कर्मचारी

Web Title: Navratri: I am Durga: Satisfaction of losing Corona is worth lakhs: Jyoti Taware, hopeful staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.