Confusion at a meeting of Teachers Bank | शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ
शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नोकरभरतीवरून गोंधळ उडाला. सभेच्या सुरुवातीपासूनच स्टापिंग पॅटर्नास मंजुरी आणि नोकरभरतीचा प्रश्न लावून धरत विरोधकांनी सत्तारूढ गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला; पण स्टापिंग पॅटर्नपूर्वीच मंजूर आहे, वाढलेला व्यवसाय पाहता सहकार विभागाची मान्यता घेऊनच भरती प्रक्रिया पारदर्शक राबविल्याचे सांगत, पाऊण तास सभा संयमाने हाताळण्याची मुत्सद्देगिरी सत्तारूढ गटाने दाखविली.
शिक्षक बॅँकेची ८१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन मल्टिपर्पज हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील होते. सभेच्या सुरुवातीला बॅँकेचे उपाध्यक्ष बाजीराव कांबळे हे स्वागत करत असतानाच सुनील पाटील, रवींद्र पाटील, जोतिराम पाटील यांनी पोलिसांनी कारवाईबाबत दिलेल्या समजाबद्दल विचारणा केली. आम्ही सभा उधळून लावणार असे म्हटलोच नसताना नोटीस कशासाठी? याचा खुलासा करण्याची मागणी सुनील पाटील व रवींद्र पाटील यांनी केली. त्यानंतर अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. नोटाबंदीनंतर बॅँकिंग क्षेत्र अडचणीत आले असताना काटकसरीच्या कारभारातून बॅँकेला सक्षम केले. रिझर्व्ह बॅँकेच्या निकषास अधीन राहून कामकाज केल्यानेच राष्टÑीयीकृत बॅँकांशी आम्ही स्पर्धा करू शकतो. बॅँक अडचणीत होती, त्यावेळी अनेक सभासदांनी राजीनामे देऊन शेअर्स भांडवल परत घेतले होते. आता बॅँक सक्षम झाल्याने अहवाल सालात १०४ सभासदांबरोबर १.६२ कोटी भागभांडवलात वाढ झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. अध्यक्षांचे भाषण सुरू असतानाच हस्तक्षेप करीत वसंत मनमाडकर यांनी नोकरभरतीच्या विषयाला तोंड फोडले. सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, विषय पत्रिकेनुसार कामकाज सुरू राहू दे, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी मागील प्रोसेडिंग वाचन केले. स्टाफिंग पॅटर्नला मागील सभेत विरोध झाला असताना, मंजूर कसे लिहिले, अशी विचारणा विरोधकांनी करत हे प्रोसेडिंगच खोटे असल्याचा आरोप जोतिराम पाटील, राजेंद्र पाटील, प्रमोद तौंदकर यांनी केला. विशेष सभा बोलविण्याची मागणी बहुताने केली असताना, ती बोलावली नाही. मागील सभेच्या कामकाजाची माहिती का दिली नाही, असे रवींद्र पाटील यांनी विचारले.
स्टाफिंग पॅटर्नला दोन वर्षांपूर्वीच्या सभेने मान्यता दिली होती; त्यामुळे प्रोसेडिंग बोगस म्हणणे चुकीचे असून, बॅँकेचा व्यवसाय वाढला आहे, त्यात सेवानिवृत्तीमुळे कर्मचारी कमी झाल्याने वसुलीवर परिणाम व्हायचा; त्यामुळे सहकार विभागाची परवानगी घेऊन भरती केली. तीही शासनाने नेमून दिलेल्या एजन्सीकडून आॅनलाईन परीक्षा घेऊन केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. लेखी प्रश्नांना अध्यक्ष पाटील उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ सुरू केला. संचालकांचा धिक्कार करीत विरोधकांनी सभास्थळ सोडले.


Web Title: Confusion at a meeting of Teachers Bank
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.