आयला - द डॉटर ऑफ वॉर- युद्धाच्या कॅनव्हासवर बापमुलीच्या नात्याची गुंफण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 11:51 AM2020-10-12T11:51:06+5:302020-10-12T12:05:31+5:30

Ayla - The Daughter of War, film, internationalcinema, entertainment मी यापूर्वी अनेकवेळा युद्ध हा महत्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या हेव्यादाव्यांचा खेळ असतो, हे लिहिलेलं आहे ! युद्धात मारणाऱ्या आणि मरणाऱ्या प्रत्येकाला त्याचं कुटुंब असतं. त्याचं त्याच्या कुटुंबावर अतिशय प्रेम असतं. जसं तुमचं-आमचं असतं तसंच !

Ayla - The Daughter of War | आयला - द डॉटर ऑफ वॉर- युद्धाच्या कॅनव्हासवर बापमुलीच्या नात्याची गुंफण

आयला - द डॉटर ऑफ वॉर- युद्धाच्या कॅनव्हासवर बापमुलीच्या नात्याची गुंफण

ठळक मुद्देआयला - द डॉटर ऑफ वॉर युद्धाच्या कॅनव्हासवर बापमुलीच्या नात्याची गुंफण

मी यापूर्वी अनेकवेळा युद्ध हा महत्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या हेव्यादाव्यांचा खेळ असतो, हे लिहिलेलं आहे ! युद्धात मारणाऱ्या आणि मरणाऱ्या प्रत्येकाला त्याचं कुटुंब असतं. त्याचं त्याच्या कुटुंबावर अतिशय प्रेम असतं. जसं तुमचं-आमचं असतं तसंच !

सैनिकांच्या घरातही त्याचा मुलगा, मुलगी, पत्नी, वृद्ध आई बापांची सेवा, बहीण भावांची लग्न इत्यादी जबाबदाऱ्या असतात!  जशा आपल्या कुटुंबात असतात तशाच ! तरीही कधी सत्तेसाठी, कधी संपत्तीसाठी, कधी शांती पसरवण्याचा नावाखाली, कधी बंडखोरांचा बिमोड करण्याच्या नावाखाली युद्ध घडवली जातात आणि हार-जितीच्या फैसल्यावर आपला देश किती महान वगैरे अभिमान मिरवले जातात.

युद्धाच्या परिस्थितीची सहेतुक पेरणी करण्यासाठी देशभक्तीचं वातावरण पेटवलं जातं. देश ज्या गोष्टींनी बनतो त्या माणसे, माती,पाणी, हवा, प्राणी, पक्षी, निसर्ग या गोष्टींना बगल देऊन शाब्दिक नाऱ्यांनी देशभक्ती पिकवली जाते ! प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन युद्ध न करणारे - सोशल मिडिया आणि मिडियावरून देशभक्ती प्रकट करतात ! हे लोक जेव्हा सामाजिक कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा ' नॉट माय प्रॉब्लम ! ' अशी भूमिका घेऊन बाजूला होतात !

युद्धात आई वडील गमावलेल्या मुलांचं पुढं काय होत असेल? युद्धात मुलगा / मुलगी गमावलेल्या आई-वडीलांची काय अवस्था होत असेल ? युद्धात बाप गमावलेल्या पोरांची काय अवस्था होत असेल ?

 कधी विचार केलाय या गोष्टींचा ?

माणूस म्हणून प्राप्त झालेल्या संवेदनांचा परीघ आपण कधी ' वसुधैव कुटुंबकम ' पर्यंत विस्तारलाय .. ?
का आपण फक्त लिहिण्या-वाचण्या-बघण्या- बोलण्यापुरतेच माणूस राहिलोय ?

ज्यानं त्यानं स्वतःला त्या सैनिकाच्या, त्याच्या आई-वडीलांच्या, त्याच्या पत्नीच्या, त्याच्या मुलांच्या, त्याच्या भाऊ बहिणीच्या, मित्राच्या, नातेवाईकाच्या रुपात बघावं किंवा युद्धानं प्रभावित होणाऱ्या यांपैकी कुणाच्या तरी जागेवर स्वतःला ठेवावं आणि मग युध्दाचं उदात्तीकरण करावं ! पर्यावरणातले प्राणी, पक्षी, पाणी, माती, झाडं आणि स्वतः माणूस अगदी संपण्याच्या स्थितीला येऊन ठेपलाय तरी युध्दाच्या परिणामांपासून तो काही शिकत नाहीत .

सिनेमाची कथा

सिनेमा लिहिलाय आणि दिग्दर्शित केलाय कॅन उल्काय यांनी ! हा सिनेमा वास्तविक घटनेवर अवलंबून आहे .

सुलेमान नावाचा तुर्की सैनिक १९५० च्या सुमाराला त्याच्या अनेक तुर्की जवानांच्या तुकड्यांसहित कोरियाच्या भूमीवर युद्धात मदत करण्यासाठी जातात. तिथं युद्धात मारल्या गेलेल्या आई -वडीलांच्या हाताला घट्ट पकडून बसलेली एक मुलगी सुलेमानला सापडते. तो आणि तिचे मित्र तिचा बेस कॅम्पवर सांभाळ करतात. आयला आणि सुलेमानमध्ये अतिशय लाघवी बापमुलीच्या नात्याची गुंफण इथं होते.

एका वर्षाच्या कालावधीनंतर कोरियातून तुर्कस्तानला परत जाण्याची वेळ येते तेव्हा आयलामध्ये जीव गुंतलेला सुलेमान आणखी काही काळ कोरियात रहातो. आयला त्याला सोडून रहात नाही आणि तो तिला. परंतु जेव्हा खूपच काळ सुलेमान राहतो हे पाहून त्याला सक्तीने तुर्कस्तानला पाठवण्याचा आदेश मिळतो. मनावर दगड ठेऊन तो आयलाला अनाथ मुलांच्या शाळेत ठेऊन निघू पाहतो तेव्हा आयला त्याच्या मागे येते.

सुलेमान शक्कल लढवून तिला सुटकेसमधून आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न करतो ; पण तो पकडला जातो. शेवटी आयलाला नाईलाजानं कोरियात सोडून त्याला जहाजावर चढावं लागतं. पण निघताना तो आयलाला पुन्हा माघारी येण्याचं आश्वासन देतो.

युद्ध संपल्यावर तो तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो ; पण यात त्याला यश येत नाही . सलग ६० वर्षं तो आयलाच्या शोधात आहे ! काही पत्रकार आणि माहितीपट बनवणाऱ्या लोकांकरवी तिचा शोध लागतो आणि तब्बल साठ वर्षांनंतर या मानलेल्या बापाची त्याच्या मानलेल्या मुलीशी भेट होते.

दर्शक म्हणून सिनेमा बघायला बसलो तरी, या सबंध चित्रपट प्रवासात आयला आणि सुलेमान यांच्या भूमिका जगण्याची अनुभूती आपल्याला येत रहाते. आयलाला मिळणारा बापासारख्या सुरक्षित, आश्वासक प्रेमाच्या हाताला आपण आसुसतो ! वाटतं की हा हात हयातभर सुटू नये ! सुलेमानचा शोध फक्त त्याचा न रहाता तो आपल्या सगळ्यांचा होऊन जातो. आणि जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा मोठया हुंदक्यांनीशी फक्त डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांच्या धारा राहतात.

-अमित प्रभा वसंत

Web Title: Ayla - The Daughter of War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.