Class 10th (United Sanskrit) paperwork and format | इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका​​​​​​​ व प्रारुप
इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका​​​​​​​ व प्रारुप

ठळक मुद्दे इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका​​​​​​​ व प्रारुप अभ्यासक्रम बदलासह मूल्यमापन पद्धतीतही बदल

 इयत्ता १० वी (संयुक्त संस्कृत) कृतिपत्रिका व प्रारुप 

विद्यार्थी मित्रांनो,

इयत्ता १०वीची परीक्षा आता जवळ आली असून सर्वजण जोमाने अभ्यास करत असाल. पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारी भाषा म्हणून आपण संस्कृत विषयाकडे पाहातो.

यावर्षी अभ्यासक्रम बदलासह मूल्यमापन पद्धतीतही बदल झाला आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे संयुक्त संस्कृतची लेखी परीक्षा ५० गुणांची असणार आहे. या कृतिपत्रिकेत एकूण पाच विभाग असतील. सर्व सूचना संस्कृतमध्येच दिल्या जातील.

कृतिपत्रिकेचे विभाग -

प्रथम: विभाग: - रम्य संस्कृतम् - १० गुणा: ।
द्वितीय: विभाग : - गद्यम् - १६ गुणा: ।
तृतीय: विभाग: - पद्यम् - १२ गुणा: ।
चतुर्थ: विभाग: - लेखन कौशल्य - ४ गुणा: ।
पंचम: विभाग: - भाषाभ्यास: - ८ गुणा: ।

सर्वात प्रथम विभागात चित्रपदकोष:, १ ते १०० सङ्ख्यालेखनम्, समयलेखन व वासरतालिका याचा अंतर्भाव केला आहे. गद्य विभागात जे पाठ आहेत, त्यांचे सतत वाचन करणे गरजेचे आहे. काही पाठ केवळ सरलार्थ लेखनासाठी आहेत. त्यांचाही भाषांतरासह सराव करावा. पाठातील अव्यये, विभक्ती, नामे, सर्वनामांचा कसून अभ्यास करायला हवा. पाठांची नावेही स्मरणात ठेवणे गरजेचे आहे.

पद्य विभागातील कण्ठस्थीकरणार्थ म्हणजे पाठांतरासाठी जे श्लोक आहेत, त्यांचा सराव लेखी करावा. भाषांतर, कृती व लकार समजून घ्यावेत. श्लोकपूर्तीसाठीही सुभाषितांचा सरावा करावा.
लेखनकौशल्यामध्ये धातू - अव्यये यांचा वापर, अनुवाद कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. अमरकोषाचे पाठांतर त्याआधारे वाक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भाषाभ्यास - या विभागात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रीयापद यांचे पृथक्करण करायचे आहे. त्यासह समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, विशिष्ट विभक्ती ओळखणे, संख्यावाचकांच्या क्रमवाचक व आवृत्तीवाचकाचाही सखोल अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा.

पाठ्यांशानंतरचे रंगीत चौकोन नीट पाहावेत. पाठ्यपुस्तकाशेवटी ५० गुणांसाठीची जी कृतिपत्रिका व प्रारुप दिले आहे त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. आराखडा सतत डोळ्यापुढे ठेऊन त्यानुसार अभ्यासांचे व नंतर कृ तिपत्रिकेचे नियोजन केल्यास संस्कृ तमध्ये भरघोस गुण संपादन आपण सहज करु शकू.

संस्कृत संयुक्तच्या ‘आनन्द:’ या पाठ्यपुस्तकाचा सर्वस्वी आनंद घेऊन आपण यशाकडे मार्गक्रमण करुया. लवकरच येऊ घातलेल्या शालांत परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझे शुभाशीर्वाद!

धन्यवाद!

  •  मंजिरी आगाशे,

फाटक हायस्कूल, रत्नागिरी


Web Title:  Class 10th (United Sanskrit) paperwork and format
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.