उमेदवारी अधांतरी, इच्छुक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:45+5:30

विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी झाली. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. गावागावांत उमेदवारीवरून चर्चा सुरु झाल्या. कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याचे आराखडे बांधले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पक्षांनी अद्यापपर्यंत आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही.

Under the nomination, the aspirants are delusional | उमेदवारी अधांतरी, इच्छुक संभ्रमात

उमेदवारी अधांतरी, इच्छुक संभ्रमात

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : पितृपक्षानंतरच होणार नावे निश्चित, तुमसर, भंडारा, साकोलीत अनेक इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभेसाठी बाशिंग बांधून असलेल्या इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापही आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याचा संभ्रम कायम आहे. दुसरीकडे युती - आघाडीत जागा कुणाच्या वाट्याला जातात हेही निश्चित नाही. आता पितृपक्ष संपल्यानंतरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल, अशी स्थिती आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी झाली. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. गावागावांत उमेदवारीवरून चर्चा सुरु झाल्या. कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याचे आराखडे बांधले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पक्षांनी अद्यापपर्यंत आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली असली तरी पक्षाने ऐन वेळेवर तिकीट नाकारले तर काय? म्हणून अनेकांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदार संघ युतीमध्ये कुणाच्या वाट्याला सुटतो याची प्रचंड उत्सूकता आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला होता. तर २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले. त्यामुळे आता ही जागा कुणाला मिळणार याबाबत संभ्रम दिसत आहे. वरिष्ठ पातळीवर अद्यापही युती तळ्यात-मळ्यात असल्याने भंडाराच्या जागेवर सस्पेंस कायम आहे. त्यातच भाजपने या मतदारसंघात पूर्ण ताकतीनिशी लढण्याची तयारी चालविली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार यावरूनही चर्चा होत आहे.
काँग्रेसने या मतदार संघात लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. राष्ट्रवादीही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. मात्र अद्याप कुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झाली नसल्याने केवळ अंदाज बांधून अनेकजण कामाला लागल्याचे दिसत आहे.
साकोली विधानसभा मतदार संघ युतीत भाजपच्या आणि आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी अद्यापपर्यंत आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे येथेही अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत.
ऐनवेळी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते यावरच राजकीय समीकरण आखले जाणार आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात अनेक जण इच्छुक आहेत. भाजप कुणाला तिकीट देणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे ही जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला याबाबत अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये संभ्रम दिसत आहे.
२७ सप्टेंबर पासून नामांकन दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे. राजकीय वातावरण तापत असले तरी निवडणुकीचा उत्साह मात्र अद्यापही दिसत नाही. प्रत्येक उमेदवार उमेदवारीच्या चिंतेत दिसत आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार नाही असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे सर्वांना पितृपक्ष संपण्याची प्रतीक्षा करावी लागेल. रविवारी पितृपक्ष संपणार असून त्यानंतरच उमेदवारांच्या नावांची लॉटरी उघडली जाणार यात शंका नाही.

सोशल मीडियावर घमासान
विधानसभा उमेदवारांच्या नावावरून सोशल मीडियावर घमासान सुरु आहे. इच्छुक उमेदवारांचे समर्थक वेगवेगळ्या पोस्ट टाकत आहेत. कुणाला उमेदवारी मिळणार यावरही भाष्य केले जात आहे. युती होणार की नाही याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक जण आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आपणच कसे सर्वमान्य उमेदवार आहोत, आपला जनसंपर्क किती दांडगा आहे याची खात्री दिली जात आहे. मात्र पक्षश्रेष्ठी कुणाला तिकीट देणार हे मात्र सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

Web Title: Under the nomination, the aspirants are delusional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.