जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात भयाण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:46+5:302021-01-15T04:29:46+5:30

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाला पाच दिवस उलटले तरी प्रसूतीपश्चात वॉर्डात अद्यापही भयाण शांतता आहे. एक वॉर्ड रिकामा ...

Terrible silence in the post-natal ward of the district hospital | जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात भयाण शांतता

जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात भयाण शांतता

Next

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाला पाच दिवस उलटले तरी प्रसूतीपश्चात वॉर्डात अद्यापही भयाण शांतता आहे. एक वॉर्ड रिकामा करून लगतच्या वॉर्डात सर्व मातांना ठेवण्यात आले असून त्यांच्या डोळ्यात बाळाच्या सुरक्षेची भीती दिसून येते. मोजकेच अधिकारी आणि परिचारिका येथे कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. अग्निकांड घडलेल्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन्ही वॉर्ड असून त्या रात्री एका वॉर्डात धूरही भरला होता.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे भीषण अग्निकांड घडले. दहा बालकांचा यात बळी गेला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. या कक्षालगतच प्रसूतीपश्चात दोन वॉर्ड आहेत. आकस्मिक वॉर्ड क्रमांक ६ आणि ७ असून वॉर्ड क्रमांक ६ चे मागचे दार नवजात अतिदक्षता कक्षात उघडते. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह विश्रांती घेत होत्या. शनिवारच्या पहाटे अग्नितांडव सुरू असताना वॉर्ड क्रमांक ६ मध्ये धूर शिरला होता. एका खाटेला आगीच्या ज्वाळांनी स्पर्शही केला होता. घटनेनंतर वॉर्ड क्रमांक ६ रिकामा करण्यात आला असून ३४ नवजात बाळ आणि मातांना ताबडतोब सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आता या मातांची व चिमुकल्यांची व्यवस्था वॉर्ड क्रमांक ७ मध्ये करण्यात आली आहे. पाच दिवस लोटूनही या दोनही वॉर्डांत भयाण शांतता दिसत आहे. वॉर्ड क्रमांक ६ मधील सर्व बेड ओस पडलेले आहेत. वॉर्डच नव्हे तर संपूर्ण रुग्णालय आता भकास वाटत आहे. वॉर्ड क्रमांक ७ मध्ये असलेल्या मातांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दिसून येते. त्यांच्या डोळ्यात आजही बाळाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी दिसते.

बॉक्स

पाच दिवसांत ६५ बाळांचा जन्म

जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्नितांडवानंतर पाच दिवसांत ६५ बाळांनी जन्म घेतला. त्यात आकस्मिक वॉर्ड, इलेक्टिव्ह विभाग - वॉर्ड क्रमांक ६ व ७ मध्ये जन्मलेल्या बाळांचा समावेश आहे. शनिवार ९ जानेवारी ते १३ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बाळांच्या जन्माची नोंद आहे. घटना घडली त्या शनिवारी प्रसूतीसाठी आठ गर्भवतींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दिवशी सहा मुली आणि दोन मुलांचा जन्म झाला. १० जानेवारी रोजी जन्माला आलेले एक मूल कमी वजनाचे असल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. उर्वरित सर्व बालके सुस्थितीत असल्याने एसएनसीयूमध्ये त्यांच्यावर उपचाराची गरज नसल्याची माहिती आहे. प्रसूतीपश्चात वॉर्डात या मातांना ठेवण्यात आले आहे. परंतु जिल्हा रुग्णालयाची घडी विस्कटली असल्याने योग्य उपचार होत नसल्याची खंत काही मातांनी व्यक्त केली.

बॉक्स

ती सात बालके कुटुंब कल्याण विभागाच्या कक्षात

भीषण अग्निकांडात बचावलेल्या सात नवजात बाळांसाठी कुटुंब कल्याण विभागाच्या कक्षात तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या एसएनसीयू कक्षात हलविण्यात आले आहे. तेथे या सात बालकांवर विशेष उपचार केले जात असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Terrible silence in the post-natal ward of the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.