पाऊस थांबला, रेतीचा अवैध उपसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:46+5:30

बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री केली जात असल्याची माहिती आहे. प्रकरणी महसूल व खनिकर्म विभाग डोळे झाकून असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

The rain stopped, illegal extraction of sand continued | पाऊस थांबला, रेतीचा अवैध उपसा सुरू

पाऊस थांबला, रेतीचा अवैध उपसा सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता नदीपात्रातून रेतीचा उपसा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने त्याचा फायदा रेतीतस्कर उचलत आहेत. करडी परिसरसह साकोली, लाखनी व लाखांदूरात रेतीचा अवैध व्यवसाय पुन्हा फोफावत आहे.
करडी (पालोरा) : बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री केली जात असल्याची माहिती आहे. प्रकरणी महसूल व खनिकर्म विभाग डोळे झाकून असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
 पालोरा ते बोरगाव मार्गावर बोरगाव स्मशानभूमीच्या जागेत अवैध रेती विक्रीचे डम्पिंग यार्ड तयार केला जात आहे. अवैधरीत्या ट्रॅक्टरद्वारे रेतीचे उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास वर्दळ वाढल्याने अपघाताची शक्यता आहे. रेती भरून ट्रक व ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असल्याने, रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, परंतु बांधकाम विभाग या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. 
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या डम्पिंग यार्डची पूर्ण माहिती आहे. नव्हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या पाठबळाने व साठगाठीतून ठिय्या तयार झाल्याचे सांगितले जात आहे. 
यासाठी रेती तस्करांकडून देवाण-घेवाण झालेली असल्याने त्यांनी या रस्त्याने न जाण्याची शपथ घेतल्याचे बोलले जाते. परिणामी, महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याकडून कारवाई केली जात नसल्याने, खुलेआम रेती तस्करीचा गोरखधंदा दिमाखात सुरू आहे. महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय? त्या रेती तस्कराचा शोध घेऊन कारवाई करणार काय, याकडे बोरगाववासीयांचे लक्ष लागले आहे.

परसोडी, गोंडउमरी घाटावर रेतीची वाहतूक
गोंडउमरी : साकोली तालुक्यातील परसोडी, गोंडउमरी, महालगाव  व पळसगावमधील पवारटोली या घाटावरून ट्रॅक्टर व इतर वाहनाने मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असून,  ११ वाजेपासून रेतीची वाहतूक केली जात आहे. याकडे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक घाटावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. ये-जा करण्यासाठी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने कारवाई करून रेती माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे. मागील चार वर्षांपासून या मार्गावर बैलगाडीच्या साह्याने कोट्यवधी रुपयांच्या रेतीची चोरी करण्यात आली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सातत्याने होत आहे.

 

Web Title: The rain stopped, illegal extraction of sand continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.