महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 08:42 PM2019-08-27T20:42:19+5:302019-08-27T21:40:43+5:30

महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

Plan of to destroy Maharashtra | महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

Next
ठळक मुद्दे भंडाऱ्यात पोहचली महापर्दाफाश यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाच वर्षांपूर्वी राज्यावर दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटींवर पोहचले आहे. प्रत्येक शासकीय विभागात दीड लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, सभापती प्रेम वनवे, शिशीर वंजारी, कैलाश भगत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शाम पांडे, धनराज साठवणे, डॉ.ब्राम्हणकर, टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, भाजपने फक्त आश्वासनांवर जनतेचा कौल मिळविला, मात्र जनतेला आश्वासनाऐवजी कुठलीच परतफेड केली नाही. दुष्काळ सुरु असताना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. मात्र आता भर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात पुराचे थैमान असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त होते. भाजप शासनाच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या असंवेदनशील सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कार्य केले आहे. पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून दर महिन्याला तीन हजार ५०० कोटी रुपयांची लुट सामान्य जनतेकडून केली जात आहे. शेतकरी कर्जमाफी ही केवळ फार्स ठरली आहे. गरीबांच्या पैशांची उधळपट्टी सर्रास केली जात असून ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या काँग्रेस शासन काळातील आहेत. संविधान व लोकशाही व्यवस्था महत्वाची असताना भाजपचे खासदार मात्र शहीदांबद्दल अपमानकारक वक्तव्य करून जनभावना भडकावित आहेत. नोकरभरती बंद असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही देण्यात आली नाही. ३७० कलम हटविण्यावर भाजपची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. वीज व आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसची नीती स्पष्ट असून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याने याबाबत जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय काँग्रेसही घेईल असा सुतोवाचही त्यांनी केला.

तर प्रचाराची भूमिका महत्वाची
साकोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी आहे काय? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठांना याबाबत मी आपली भूमिका कळविली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून लढविण्यापेक्षा प्रचार कार्यात सहभागी होणे महत्वाचे आहे. हीच भूमिका महत्वाची असून काँग्रेसला बळकट करणे हेच माझे ध्येय असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Web Title: Plan of to destroy Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.