लोहारा : खरीपाच्या हंगामासाठी पेरणी करण्यास तयारी असताना पावसाने डोळे फिरविल्यामुळे क्षेत्रातील बळीराजा हवालदिल झालेला आहे.लोहारा तथा क्षेत्रामध्ये प्रत्येक लहान-मोठा शेतकरी खरीपाच्या हंगामाची तयारी एक-दीड महिन्यापासून करीत आहे. ज्यामध्ये नांगरटी, धुऱ्याची सफाई, शेणखत बांधामध्ये घालणे, तण-धसकटे जाळणे इत्यादी व अन्य कामे करण्यात आली. रोहिणी नक्षत्राचे आगमन होताच शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या की पाऊस बरसणार. पण मृग नक्षत्र संपत असताना वरुणराजाची नाराजी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणत आहे. परिसरात चुलबंद नदीचे खोरे असल्यामुळे अल्प प्रमाणात असलेले पंपधारक धानाचा पऱ्हा जगवित आहेत. मात्र जे सधन नाहीत, पाण्याची सुविधा नाही त्यांनी साधी पेरणीसुद्धा केलेली नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घरगुती तयार केलेले व काही कंपन्यांचे महागडे वाण घेऊन ठेवलेले आहेत. मात्र पाण्याअभावी सर्वच शून्य आहे. (वार्ताहर)
पावसाअभावी बळीराजा हवालदिल
By admin | Updated: June 18, 2014 23:55 IST