नामांकन आजपासून, उमेदवारी अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:00 AM2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:30+5:30

भंडारा विधानसभा मतदार संघात उमेदवारांच्या नावावरुन वेगवेगळ्या चर्चा दररोज ऐकायला येत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. सर्वाधिक उत्सुकता भाजपच्या उमेदवारीचीच दिसत आहे.

Nomination starting today, under candidacy | नामांकन आजपासून, उमेदवारी अधांतरी

नामांकन आजपासून, उमेदवारी अधांतरी

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : इच्छुकांची उमेदवारीसाठी धडपड, तिन्ही मतदार संघात सर्वच पक्षात रस्सीखेच

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या नामांकनाला शुक्रवारपासून प्रारंभ होत असला तरी प्रमुख पक्षांनी जिल्ह्यातील तीनही मतदार संघात आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही. पितृपक्षानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक तिकीटांसाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन मतदार संघासाठी २१ आॅक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द होत असून नामनिर्देशन पत्र भरण्यासही प्रारंभ होणार आहे. मात्र अद्यापही एकाही पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. भाजप- शिवसेना युतीचे अद्यापही निश्चित नाही. भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला कोणते मतदार संघ जाणार याची घमासान चर्चा सुरु आहे.
भंडारा विधानसभा मतदार संघात उमेदवारांच्या नावावरुन वेगवेगळ्या चर्चा दररोज ऐकायला येत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. सर्वाधिक उत्सुकता भाजपच्या उमेदवारीचीच दिसत आहे. दररोज नवनवीन नावे पुढे येत आहे. विद्यमान आमदारांसह अनेकजण भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास तयार आहे. मात्र पक्षश्रेष्ठीने अद्यापही कुणाला कामाला लागण्याचे संकेत दिले नाही किंवा अधिकृत घोषणाही केली नाही. काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीचे अद्याप ठरले नाही. कोण उमेदवार राहणार याबाबत उत्सुकता कायम आहे.
साकोली विधानसभा मतदार संघ सध्या जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत आहे. या ठिकाणी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. अनेकजन मुंबईत तळ ठोकून आहे. त्यातच एका माजी आमदाराच्या भाजप प्रवेशाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि विविध चर्चांना उधाण आले. ती पोस्ट फेक असल्याची दुसरी पोस्ट टाकण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस या ठिकाणावरुन पुर्ण ताकतीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. मात्र उमेदवार कोण राहणार हे गुलदस्त्यात आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली असून उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. भाजप कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकते, याची उत्सुकता आहे. काँग्रेस की राष्टÑवादी हाही संभ्रम कायम आहे.
युती-आघाडी सोबत बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही या निवडणुकीत राहणार असून ते कुणाचे गणित बिघडविणार याची चर्चा रंगत आहे. एकंदरीत नामांकन दाखल करण्याचा दिवस आला तरी अद्याप पर्यंत कोणत्याही पक्षाचे उमेदवार निश्चित झाले नाही. पितृपक्ष संपल्यानंतर आणि उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांच्या नावाची चर्चा रंगत राहणार. एकदा पक्षाचा एबी फार्म मिळाल्यानंतरच उमेदवारी निश्चित मानली जाईल.

जातीय समीकरणाचा बोलबाला
विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणाचा बोलबाला दिसत आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचे आणि पोटजातीचे प्राबल्य आहे, याचा विचार करुन निवडणूक लढविण्याची तयारी बहुतांश सर्वच पक्षांनी चालविली आहे. उमेदवारी देतानाही जातीय समीकरणांचा विचार केला जात आहे. कुणबी, तेली, पोवार, अनुसूचित जाती या समाजाचे प्राबल्य भंडारा जिल्ह्यात आहे. मतदारसंघातील जातींच्या प्राबल्यावरुन उमेदवारी ठरविण्याचा कल दिसत आहे. विजयाचे गणित आखण्यासाठी जातीय समीकरणांचा आधार या निवडणुकीतही घेतला जाणार आहे.

Web Title: Nomination starting today, under candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.