फायनान्स कंपनीला ग्राहक मंचाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:30+5:30

भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासाठी डिलर मार्फत महिंद्रा फायनान्स कंपनी कडून ४,८०,००० रुपये कर्ज घेतले होते.

Consumer Forum chat with finance company | फायनान्स कंपनीला ग्राहक मंचाची चपराक

फायनान्स कंपनीला ग्राहक मंचाची चपराक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : सुशिक्षित बेरोजगाराने स्वयं रोजगाराच्या हेतूने महिंद्रा फायनान्स कंपनीकडून डिलर मार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करून देखील बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या फायनान्स कंपनीला व ट्रॅक्टर डिलरला भंडारा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. कर्जापोटी जमा केलेली रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासाठी डिलर मार्फत महिंद्रा फायनान्स कंपनी कडून ४,८०,००० रुपये कर्ज घेतले होते.
२० सप्टेंबर २०१३ ला ट्रॅक्टर खरेदी करून देखील व वारंवार विनंती करूनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करून देण्यात आली नाही. या दरम्यान मात्र रुपए चार लाख ४२ हजार एवढी रक्कम कर्जापोटी त्याच्याकडून वसूल करण्यात आली.
एवढे असताना देखील सदर इंडस्ट्रीज व महिंद्रा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १३ जुलै २०१४ ला रूपचंद मेश्राम यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर बळजबरीने जप्त केला. त्यानंतर वारंवार ट्रॅक्टर ची मागणी करून देखील ट्रॅक्टर त्याला परत न मिळाल्याने त्याने अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांच्या मार्फत भंडारा जिल्हा ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल केले. नोटिस बजावण्यात आल्यावर दोन्ही कंपनीने आपल्या वकीलामार्फत लेखी उत्तर दाखल करून आक्षेप घेतला. कर्जाची परतफेड केली नाही म्हणून नोंदणी करून देण्यात आली नाही व ट्रॅक्टर रूपचंद मेश्राम यांच्याच ताब्यात आहे, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तक्रारदार रूपचंद मेश्राम यांनी आर टी ओ कार्यालयात जाऊन चौकशी केली असता खरेदीच्या एक वर्ष आठ महिण्यानंतर १ जुन २०१५ ला ट्रॅक्टरची नोंदणी केल्याचे दिसून आले. तसेच तक्रारदाराने महिंद्रा फायनान्स कंपनीच्या वडधामना,नागपूर येथील यॉर्डमधील वाहनांची तपासणी केली असता त्याचा ट्रॅक्टर तिथे आढळून आला.
या प्रकरणी सखोल युक्तिवाद करून राष्ट्रीय आयोगाने पारित केलेल्या न्याय निर्णयाचे दाखले देवून ७० टक्के कर्ज रक्कमेचा भरणा केल्यावर वाहन जप्त करता येत नाही. ट्रॅक्टरची नोंदणी वेळीच करून दिली नाही, त्यामुळे तक्रारदाराने कर्जापोटी भरलेली रक्कम व्याजासह परत द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केली.
या प्रकरणी ग्राहक तक्रार मंच भंडाराचे अध्यक्ष न्यायाधीश भास्कर योगी व सदस्य वृषाली जागीरदार यांनी चौकशी करून व कागदपत्रासह दिलेल्या पुराव्याचे अवलोकन करून तक्रारदाराची तक्रार मंजूर केली. सदर दोन्ही कंपनीने चार लाख ४२ हजार रुपयांची रक्कम ९ टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. तसेच मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रुपये २० हजार व प्रकरण खर्चाचे रुपए १० हजार तक्रारदार मेश्राम यांना द्यावेत, असे देखील आदेश दिले आहेत.

Web Title: Consumer Forum chat with finance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.