वैनगंगा नदी तीरावरील गावातील नागरिक नाईलाजाने पितात दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:00 AM2020-03-22T05:00:00+5:302020-03-22T05:00:09+5:30

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे.

Citizens of the village on the banks of the Wainganga river drink contaminated water with indigestion | वैनगंगा नदी तीरावरील गावातील नागरिक नाईलाजाने पितात दूषित पाणी

वैनगंगा नदी तीरावरील गावातील नागरिक नाईलाजाने पितात दूषित पाणी

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालानंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा प्रशासनाच्या लेखी टँकरमुक्त असून विशाल पात्र असलेल्या वैनगंगेमुळे तशी पाणीटंचाई जाणवत नाही. परंतु वैनगंगेचे दूषित पाणी आता कळीचा मुद्दा झाला असून भंडारा आणि पवनी तालुक्यातील वैनगंगा तिरावरील तब्बल ६७ गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. प्रशासनाच्या वतीने जल शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे. भंडारा तालुक्यातील ३३ आणि पवनी तालुक्यातील ३४ असे एकुण ६७ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहेत. बहुतांश गावाच्या पाणीपुरवठा योजना वैनगंगेवरून असून पाणी कितीही शुद्ध केले तरी त्याचा परिणाम होत नाही. सध्या वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला १० एनटीयू तर तळाशी १७ एनटीयू आहे. पाच एनटीयूचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगा बचाव समितीने पाणी शुद्धीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी ६१७ गावे पाणीटंचाई उपाययोजनेत प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील ११६३ जलस्त्रोतांना पाणीटंचाईची झळ यंदा उन्हाळ्यात जाणवणार आहे.

वैनगंगा नदीच्या तीरावर पिंडकेपार गाव असले तरी गावात बोअरवेल खोदून त्यावर नळ योजना कार्यान्वित आहे. जल शुद्धीकरण संयंत्र लावण्यात आले आहे. वैनगंगेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा कुणीही वापर करीत नाही. शुद्ध पाणी पुरवठा केला जातो.
-कविता आतीलकर
सरपंच, पिंडकेपार

गणेशपूर वैनगंगेतून पाणी घेऊन ते शुद्ध करण्यात येते. परंतु १०० टक्के पाणी शुद्ध होत नाही. गावातील जलवाहिन्याही ४० टक्के जुन्या आहेत. आता गोसे प्रकल्पाच्या निधीतून नवीन विहिर तयार केली जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अडीच कोटीचा प्रस्ताव आहे.
-जया सोनकुसरे
जि.प. सदस्य, गणेशपूर

खमारी येथे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी वैनगंगा नदीपात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर विहिर खोदण्यात आली आहे. पाणी जलकुंभात आणून नळाच्या द्वारे वितरीत केले जाते. गावात कुठेही सार्वजनिक आरो नाही. दूषित पाण्याचा परिणाम फारसा होत नाही.
-कृष्णा शेंडे
सरपंच, खमारी

वैनगंगा बचाव अभियान नागरी समितीच्या वतीने वैनगंगा शुद्धीकरणासाठी लढा दिला जात आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे.
-नितीन तुमाने, अध्यक्ष, वैनगंगा बचाव अभियान नागरी समिती

Web Title: Citizens of the village on the banks of the Wainganga river drink contaminated water with indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.