Bhandara's water purification system is out of date | भंडाराची जलशुद्धीकरण यंत्रणा कालबाह्य
भंडाराची जलशुद्धीकरण यंत्रणा कालबाह्य

ठळक मुद्देदूषित पाणी : शहरातील पाईप लाईनला ठिकठिकाणी गळती, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराला पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण यंत्रणा कालबाह्य झाली आहे. याच संयंत्राच्या माध्यमातून पाणी शुद्ध केले जात असल्याने शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून नळाद्वारे लालसर पिवळट पाणी येते. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरी तीन वर्ष याच कालबाह्य संयंत्रातून ‘शुद्ध’ झालेले पाणी प्राशन करण्याशिवाय पर्याय नाही.
शहरात गत काही महिन्यांपासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. काही ठिकाणी गढूळ, लालसर आणि काही ठिकाणी तर काळेकुट्ट पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. त्यातच नाग नदीचे पाणी वैनगंगेत मिसळून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा शहरासाठी असलेले जलशुद्धीकरण संयंत्र १९९२ साली उभारण्यात आले. शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या या संयंत्राची क्षमता दररोज ९ लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची आहे. त्यावेळी ६५ हजार लोकसंख्या गृहित धरून या संयंत्राची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आता शहराची लोकसंख्या वाढत गेली. लगतच्या ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा केला जातो. क्षमता कमी आणि ग्राहक अधिक अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे या संयंत्राची मुदत १५ वर्षच होती. परंतु त्यानंतर संयंत्रासाठी वरिष्ठ पातळीवर कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे गत २७ वर्षापासून याच संयंत्रातून पाणी शुद्ध केले जाते. याठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी १५०, १०० आणि २५ हॉर्स पावरचे मोटारपंप लावण्यात आले आहे. परंतु देखभाल दुरुस्तीअभावी १०० आणि २५ हॉर्सपावरचा एक सेट बंद आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरण करताना अडचणी येतात.
भंडारा शहरातील नागरिकांना योग्य दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यात संभाजी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या टाकीची क्षमता २७ लाख लिटर, हुतात्मा स्मारकाजवळील टाकीची क्षमता १७ लाख लिटर, सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या टाकीची क्षमता ३ लाख ७५ हजार, पोलीस लाईन ६० हजार लिटर, सिव्हील लाईन ४५ हजार लिटर आणि न्यायालय इमारत परिसरातील टाकीची क्षमता ४५ हजार लिटर आहे. शुद्धीकरण झालेले पाणी या टाक्यांमध्ये सोडले जाते. परंतु शहरातील पाईप जीर्ण झाले आहेत. अनेक ठिकाणी गळती लागली आहे. रस्ता बांधकामामुळे ठिकठिकाणी पाईप फुटले आहेत. देखभाल दुुरुस्ती होत नाही. त्यामुळे शहरातील टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाही. जलशुद्धीकरण केंद्रापासून टाकीपर्यंत पाणी शुद्ध स्वरुपात जात असले तरी टाकीपासून घरापर्यंत जाणाऱ्या जलवाहिन्या कुचकामी झाल्या आहेत. या जलवाहिन्याच्या माध्यमातून अशुद्ध पाणी नागरिकांपर्यंत पोहचते.
भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा तयार केली जाणार आहे. मात्र ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी तीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत नागरिकांच्या नशिबी अशुद्ध पाणी प्राशन करणेच आहे.
नगरपरिषदेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या या जलशुद्धीकरण केंद्राच्या दूरावस्थेबाबत अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचाही अभाव असून कर्मचाऱ्यांचाही तुटवडा आहे.

दूत मिश्रक गेटला गळती
वैनगंगेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येते. त्याठिकाणी दूत मिश्रक आहे. या ठिकाणी पाण्यामध्ये तुरटीचे द्रावण मिसळले जाते. अशुद्ध पाणी रोखण्यासाठी या ठिकाणी गेट लावण्यात आले आहे. मात्र या गेटलाच गत काही दिवसांपासून गळती लागली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी थेट शुद्ध पाण्यात मिसळते. तसेच या ठिकाणी असलेल्या बाह्य संयंत्रावरील ब्रिजची पटरीही बंद आहे. परिणामी पाणी ढवळले जात नाही. दोन पैकी एक फॅनही बंद आहे. याचा परिणाम पाणी शुद्धीकरणाच्या गुणवत्तेवर होतो.

वैनगंगेचे पाणी दूषित
भंडारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेले जलशुद्धीकरण केंद्र वैनगंगा नदीच्या अगदी तिरावर आहे. ज्या ठिकाणावरून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येते तेथेपाणी थोपलेले असते. गोसे प्रकल्प होण्यापूर्वी पाणी प्रवाहित राहत होते. परंतु आता पाणी एकाच ठिकाणी थांबलेले असते. त्यातच नागनदीचे दूषित पाणी येऊन मिसळते. सोबतच शहरातील संपूर्ण सांडपाणीही त्याच परिसरात येते. त्यामुळे दूषित पाणी शुद्ध करताना मोठ्या अडचणी येतात. आधीच कालबाह्य झाले संयंत्र आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्लोअर मशीन वर्षभरापासून बंद
जलशुद्धीकरण केंद्रात असलेले ब्लोअर मशीन वर्षभरापासून बंद आहे. पाणी शुद्ध करणारे संयंत्र स्वच्छ करण्यासाठी दिवसातून एकदा ब्लोअर करावे लागते. हवेच्या दाबाने संयंत्र स्वच्छ केले जाते. परंतु एक वर्षापासून ही यंत्रणा बंद असल्याने पाणी शुद्धीकरणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.


Web Title: Bhandara's water purification system is out of date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.