Bhandara Fire; चिमुकल्यांची अवस्था पाहून मन विव्हळत होते; फायर फायटरने सांगितला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 07:00 AM2021-01-13T07:00:00+5:302021-01-13T07:00:07+5:30

Bhandara Fire रुग्णालयात आग लागली. तत्काळ पोहोचा. क्षणाचाही विलंब न लावता २.०५ वाजता घटनास्थळी दाखल झालो. चिमुकल्यांची आगीने झालेली अवस्था पाहून मन तडपायला लागले. असा त्या काळरात्रीचा थरार अनुभव भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहनचालक हमीद खान पठाण सांगत होते.

Bhandara Fire; The state of Chimukalya was disturbing; The firefighter said trembling |  Bhandara Fire; चिमुकल्यांची अवस्था पाहून मन विव्हळत होते; फायर फायटरने सांगितला थरार

 Bhandara Fire; चिमुकल्यांची अवस्था पाहून मन विव्हळत होते; फायर फायटरने सांगितला थरार

Next
ठळक मुद्देपहाटे १.५७ वाजता कॉल अन् २.०५ वाजता घटनास्थळी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : शनिवारी पहाटे १.५७ वाजता मोबाईल खणखणला. पाहतो तर पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल दिसत होता. क्षणार्थात कॉल उचलला. समोरून आवाज आला, रुग्णालयात आग लागली. तत्काळ पोहोचा. क्षणाचाही विलंब न लावता २.०५ वाजता घटनास्थळी दाखल झालो. सुरुवातीला तीव्रता वाटली नाही, परंतु फायर फायटरसह रुग्णालयाच्या आत शिडी लावून पोहोचलो आणि चिमुकल्यांची आगीने झालेली अवस्था पाहून मन तडपायला लागले. कोणताही विचार न करता मदत सुरू झाली, असा त्या काळरात्रीचा थरार अनुभव भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहनचालक हमीद खान पठाण सांगत होते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत बचाव कार्यासाठी धावून गेलेल्या भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी त्या रात्रीचा दीड तासांचा थरार ‘लोकमत’ला सांगितला.

वाहनचालक हमीद खान पठाण नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जलशुद्धीकरण केंद्रावर असलेल्या फायर फायटरनमध्ये आपल्या वाहनात बसून होते. पहाटे १.५७ वाजता त्यांचा मोबाइल खणखणला. भंडारा पोलीस नियंत्रण कक्षातून आलेला तो कॉल होता. काहीतरी अघटित घडल्याची शंका त्यांच्या मनात आली. कॉल उचलताच जिल्हा रुग्णालयात आग लागली तत्काळ पोहोचा, असा निरोप मिळाला. त्यावेळी फायरमन कृष्णा मसराम, राजू सोनवाने, मुस्ताक शेख त्यांच्यासोबत होते. अग्निशमन वाहन रुग्णालयात २.०५ वाजता पोहोचले. तत्काळ शिडी काढून नवजात शिशु कक्षाच्या बाहेरील बाजूने इमारतीला शिडी लावून कृष्णा मसराम, हमीद खान आणि राजू सोनवाने सरसर पहिल्या माळ्यावरील गॅलरीत पोहोचले. मात्र, वाॅर्डात जाणारे गॅलरीतील दार बंद होते. जोरदार धक्के देऊन दार उघडले. खिडक्या उघडल्या. सर्वप्रथम इन बॉर्न युनिटमध्ये प्रवेश केला. तेथे काळा धूर दिसत होता. धुरामुळे नेमके तेथे काय आहे, हेही दिसत नव्हते. त्यामुळे खिडक्या उघडून तावदाने फोडून धूर कमी करण्याचा प्रयत्न केला. सात बच्चूला शिडीद्वारे इमारतीच्या बाहेरून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर, आउटबॉर्न कक्षाकडे धाव घेतली. पोर्चमध्ये सर्वत्र धूर दिसत होता. समोरचे काही दिसत नव्हते. वीजही खंडित झाली होती. कृष्णा मसराम सांगत होता, आतमध्ये काचेच्या पेट्या जळून खाली आल्या होत्या. खूप गरम लागत होते. आमचे हातही भाजले. तब्बल दीड तास झुंज देऊन आम्ही सात बालकांना वाचविले. ती निरागस दहा बालकेही वाचली असती, तर आमच्या श्रमाचे चीज झाले असते. यावेळी इतरही कर्मचारी मदतीसाठी धावपळ करीत होते.

घटनेची माहिती होताच, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव आणि नगरपरिषदेचे प्रमुख फायर अधिकारी फाल्गुन वाढई रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याच मार्गदर्शनात ही दीड तासांची लढाई आम्ही लढली, असे फायरमन सांगत होेते.

हात भाजले तरी मदत थांबली नाही

चिमुकल्यांना बाहेर काढताना आमचे हात भाजले, परंतु त्यावेळी त्याची जाणीवही झाली नाही. डोळ्यासमोर केवळ चिमुकले जीव दिसत होते. त्यांना कसे वाचविता येईल, याचेच विचार मनात होते. त्या चिमुकल्यांचे देह पाहून मन कासावीस होत होते, असे वाहन चालक हमीद खान पठाण यांनी सांगितले.

दहा चिमुकले वाचले असते, तर मदतीचे चीज झाले असते

या घटनेत दहा निष्पाप बाळांचा बळी गेला. या दहाही बाळांना आम्हाला वाचविता आले असते, तर आमच्या मदतीचे खरे चीज झाले असते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. धुराने काळवंडलेले देह पाहून हृदयात कालवाकालव होत होती. आजही ती घटना आठवली की, अंगावर काटा येतो, असे या बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या चारही फायरमननी सांगितले.

Web Title: Bhandara Fire; The state of Chimukalya was disturbing; The firefighter said trembling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.