हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी

By मुकेश चव्हाण | Published: January 10, 2021 09:35 AM2021-01-10T09:35:49+5:302021-01-10T09:36:01+5:30

पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

Bhandara Fire: The joy of the birth of a daughter is sad, the ashes of dreams | हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी

हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी

Next

भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश मिळाले होते. मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच देशभरातून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

रुग्णालयात आग लागताच बाहेर थांबलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनी नवजात कक्षाकडे धाव घेतली. ओल्या बाळंतिणी व त्यांचे नातेवाईक डॉक्टर व नर्सेसमागे धावत होते. प्रशासनाने सगळ्या मातांना पोर्चमध्ये बसवून ठेवले. नेमके कुणाचे बाळ दगावले व कुणाचे वाचले, हे बराच वेळ स्पष्ट होत नव्हते.

इनबॉर्न विभागातील मुले वाचल्याचे स्पष्ट झाले व दिलासा मिळाला पण आऊटबॉर्न विभागात आग व धूर अधिक होता. तिथली मुले संकटात असल्याचे समजताच झालेला मातांचा आक्रोश सुरू झाला. 'आम्हाला आमची पोरगी आणून द्या, अशं हंबरडा तुमसर तालुक्यातील सिलेकसा येथील आई कविता बारेलाल कुंभरे यांनी फोडला. 

लग्नाला तीन वर्ष झाली. त्यानंतर कुंभेर दाम्पत्यांच्या घरी फुल उमलले. परंतु या जगात दाखल होताच अबोल मुलीने जगाचा निरोप घेतला. पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

नऊ दिवसांच्या मुलीचा दोष होता तरी काय?

नऊ दिवसांपूर्वीच तिला जन्म दिला. दिसायला अत्यंत सुंदर. अशक्त असल्याने तिला एसएनसीयू कक्षात दाखल केले होते. मात्र ती मला अशी पुन्हा परत मिळेल, असा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. नऊ दिवसांच्या मुलीचा काय दोष होता, असे बोलत दुर्गा विशाल रहांगडाले (टाकला, ता. मोहाडी) या मातेने आसवांना वाट मोकळी करून दिली.

कन्याजन्माचा आनंद दु:खात परावर्तित

भंडारा तालुक्यातील रावणवाडी येथील रहिवासी वंदना मोहन सिडाम यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पहिली मुलगी असली तरी दुसरे अपत्यही अत्यंत आनंदात स्वीकारत त्याचा जल्लोष करण्याचे त्यांनी ठरविले होते. लोकमत प्रतिनिधीजवळ वंदनाने आक्रोश आणि आसवांना वाट मोकळी करून दिली. जन्मताच वजन कमी असल्याने मुलीला एसएनसीयु कक्षात हलविण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र या दुर्घटनेने वंदना यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. संपूर्ण कुटुंबच दु:खात बुडाले. 

या दुर्घटनेने उभा महाराष्ट्रासह देशही हादरला-

या दुर्घटनेने उभा महाराष्ट्र तसेच देशही हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृत शिशूंच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यातील सरकारी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Bhandara Fire: The joy of the birth of a daughter is sad, the ashes of dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.