जिल्ह्यातील २५ कोटींचे धान चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:45+5:30

इंद्रपाल कटकवार/संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा/साकोली : नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला धान शासकीय खरेदी केंद्रावर ...

25 crores of paddy sticks in the district | जिल्ह्यातील २५ कोटींचे धान चुकारे अडले

जिल्ह्यातील २५ कोटींचे धान चुकारे अडले

Next
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : चार हजार शेतकऱ्यांनी विकला १.४० लाख क्विंटल धान

इंद्रपाल कटकवार/संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली : नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला धान शासकीय खरेदी केंद्रावर मोठ्या आशेने विकला. मात्र गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाले नाही. जिल्ह्यातील चार हजार ५९१ शेतकºयांचे २५ कोटी ५७ लाख १३ हजार २६२ रूपयांचे चुकारे अडले आहेत. वेळेवर पैसे मिळत नसल्याने आता शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान खरेदी सुरू झाली. जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ६३ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. येथे सर्वसाधारण धानाला १८१५ रूपये आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रूपये प्रती क्विंटल हमीभाव दिला जात आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या धान केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी धान आणला. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील चार हजार ५९१ शेतकऱ्यांनी एक लाख ४० हजार ८८८.५ क्विंटल धानाची हमी केंद्रावर विक्री केली आहे. गत तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला चुकारे मिळाले नाही. तब्बल २५ कोटी ५७ लाख १३ हजार २६२ रूपयांचे चुकारे बाकी आहे. शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा झाले की याची खातरजमा करीत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. हमी केंद्रावर वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता व्यापाºयांकडे धाव घेत आहे. परंतु तेथे हमीभावापेक्षा २०० रूपये कमी दराने खरेदी होत असल्याची माहिती आहे.
यावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पºहे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यातही पैसे वेळेवर मिळत नाही.
अनेक शेतकरी पैशासाठी वनवण भटकंती करीत आहे. उन्हाळी धान पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. परंतु विकलेल्या धानाचे हक्काचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. दुसरीकडे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. येथे पिण्याचे पाणी आणि इतर मुलभूत सुविधाही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. अनेक केंद्रात धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या मनात कायम भीती असते. अनेक शेतकरी रात्री धान खरेदी केंद्रात मुक्कामी राहतात. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहेत.

व्यापाऱ्यांचे खरेदी दर कमी
शासनाच्या उदासीन धारणामुळे शेतकरी पैशासाठी वणवण फिरत आहे. धानाचे चुकारे मिळत नसल्याने आता शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेत आहे. शासकीय दर प्रती क्विंटल १८१५ रूपये असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल १६०० रूपयाने धान खरेदी करीत आहेत. यात शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

बोनस अडचणीत?
गतवर्षी शेतकऱ्यांच्या धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्यात आला होता. यावर्षीही बोनस मिळणार, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापनेचाच गोंधळ सुरू आहे. त्यामुळे यावर्षी बोनस मिळणार की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.

Web Title: 25 crores of paddy sticks in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी