स्वार्थ सांडूनिया, करावा परमार्थ..!  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 12:14 AM2020-11-06T00:14:01+5:302020-11-06T00:29:18+5:30

भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते...

Work for others without any selfish purpose | स्वार्थ सांडूनिया, करावा परमार्थ..!  

स्वार्थ सांडूनिया, करावा परमार्थ..!  

googlenewsNext

मनुष्य जन्म हा खूप पुण्यानंतर मिळतो. त्यात जर आपण स्वार्था करता जगत राहिलो तर थोड्या थोड्या वेदनांनी, संकटांनी, अपमानांनी  आपण अत्यंत दुखी, कष्टी होऊन जातो. पण जीवनात जर आपण परमार्थाच्या सेवेत राहिलो तर आपण मानसिक, आर्थिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या खूप चैतन्यमय राहतो. प्रचंड ऊर्जेने जगाच्या पाठीवर दिवसातले २४ तास पूर्ण प्रेरणेनें कार्यरत राहतो. कारण त्यावेळी मी पणाचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. आणि परमार्थ हाच यशस्वी जीवनाचा हाच मूळ गाभा आहे. 

आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच राहिलो आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे.

सर्वांभूती भगवद्‌भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. 'मी कोण' हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे, 'देह ठेवला' असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे; म्हणजे देह हा 'मी' नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यांचा साक्षी कुणीतरी आहे हे खास. 'मी कोण' हे जाणायला साक्षीरूपाने वागावे.

भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवांचून केलेले भजनपूजन वाया जाते असे नाही समजू. भगवंताची भक्ति उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावे, मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थबुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ति.

वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून, आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो, म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी; म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल; सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. .. 

Web Title: Work for others without any selfish purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.