शब्द ईश्वराचे रुप, असे वापरावे की ऐकणाऱ्यास स्वर्गीय आनंद लाभेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 08:53 AM2021-05-05T08:53:17+5:302021-05-05T08:55:02+5:30

शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..! शब्द हा ईश्वराचे रुप आहे. तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..!

The words are like God; should be used in such a way that the hearer will enjoy heavenly bliss | शब्द ईश्वराचे रुप, असे वापरावे की ऐकणाऱ्यास स्वर्गीय आनंद लाभेल

शब्द ईश्वराचे रुप, असे वापरावे की ऐकणाऱ्यास स्वर्गीय आनंद लाभेल

googlenewsNext

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी
( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी आपल्या वाङ्॒मयातून ऐहिक जीवनासाठी अत्यंत बोधप्रद अशी शिकवण दिली. खरं तर श्रीसमर्थ रामदास स्वामींची ही एक जरी शिकवण आपण अंगीकृत केली तरी लोक आपल्याला नक्कीच सज्जन म्हणतील. एका श्लोकांत श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात -

बरे सत्य बोला यथा तथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणे तुम्हाला ॥

महात्मा गांधी सत्यालाच देव म्हणत. इथेही श्रीसमर्थ रामदास स्वामी सत्य बोलण्याचाच उपदेश करतात. आता सत्य म्हणजे तरी काय..? सर्वकाळ सर्वांनाच जे हितकारक त्याला सत्य असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद् गीतेमध्ये यालाच वाङ्॒मय तप असे म्हणतात. माणसाने बोलावे कसे..?
तर गीतामाऊली सांगते -

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितंच यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्॒मयं तप उच्यते ॥

आपल्या बोलण्याने दुसर्‍याच्या मनांत उद्वेग तर निर्माण होणार नाही ना..? याचा बोलतांना म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. आपण जे बोलतो ते प्रिय असावे, हितकारक असावे व सत्य असावे.

नुसतेच वर वर प्रिय असेल त्याला व्यापारी कृतीचे प्रिय म्हणावे लागेल. व्यापारी आपल्या मालाची विक्री व्हावी म्हणून किती गोड बोलतात..? याच गोड बोलण्याने ग्राहक फसतो आणि दुय्यम दर्जाचा माल खरेदी करतो. ही वृत्ती त्या बोलण्यात नसावी. बोलणे हितकारक असावे आणि प्रिय ही असावे. नाही तर कधी कधी असाही प्रत्यय येतो -

मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम् ।

शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..!

आपल्या सत्य बोलण्याने व सत्य चालण्याने जगांत आपल्याला नक्कीच मान मान्यता मिळेल. आपले शब्द लोक प्रमाणभूत मानतील. एका कवीने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. साहित्यिक म्हणतो -

शब्दांनीच पेटतात घरे.. देश.. आणि माणसे माणसेसुद्धा...
शब्दच विझवतात आग.. शब्दांनी पेटलेल्या माणसांची.....
शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या
वाहिले नसते आसवांचे महापूर..
आणि नसते कोणी गेले जवळ...नसते दूर...!

आज प्रगतीच्या क्षेत्रांत आपण एवढे प्रगल्भ झालो पण अजूनही जीवनांतील हा संतांचा विचार आचारसिद्ध होत नाही.
निवडणूकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर केवढी शब्दांची चिखलफेक केली जाते..? जातीजातीत केवढी तेढ निर्माण केली जाते..? आपली स्वतःची खोटी प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी इतरांना किती तुच्छ शब्दांनी ताडण केले जाते..?

शब्द हा ईश्वराचे रुप आहे..! तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Web Title: The words are like God; should be used in such a way that the hearer will enjoy heavenly bliss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.