सुखी आयुष्याची सोपी व्याख्या..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 09:10 PM2020-12-04T21:10:17+5:302020-12-04T21:17:28+5:30

तुम्हाला जर आयुष्यात कायम सुख उपभोगायचे असेल तर त्याची सुरुवात आता या क्षणापासून होऊ शकते.

Which is absolutely beautiful.! | सुखी आयुष्याची सोपी व्याख्या..!

सुखी आयुष्याची सोपी व्याख्या..!

googlenewsNext

कर्म हे सर्व सुख दुःखाचे मूळ कारण आहे. ते जर चांगले असले तर तुमचे आयुष्य आणि प्रारब्ध दोन्हीही उत्तम राहते मात्र तेच जर चुकीचे किंवा बरोबर नसेल तर मग तुमचा प्रवास विरुद्ध दिशेने सुरु राहतो. भगवद्गीता देखील सार्थकी आयुष्याचा हाच मूळ पाया असल्याचे सांगते.तरीदेखील माणूस भौतिक सुखाच्या मागे धावताना कर्माला दुय्यम स्थान देतो पुन्हा उद्विग्न होत परमेश्वरालाच दोष देत राहतो. खरंतर मनुष्य जन्म हा निर्मळ व पवित्र असा आहे. त्याचं महत्व जो जाणतो तो आपले मिळालेले आयुष्य हे समाजसेवेत व चांगल्या कृत्यात व्यतीत करण्यास प्राधान्य देतो. 

कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे, आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, ’ देवा चांगली बुद्धी दे, ’ पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बर्‍यावाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचे पाणी पुढे पुढे वाहात गेल्याने गढूळ होते होते. आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो, त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालविण्यासाठी ’राम कर्ता’ ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल. ’ गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे, ’ असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे; म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे.

सत्तावान्, श्रीमंत, वैभववान् माणसे सुखी असतात, हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, हे काही खरे बाळसे नव्हे. म्हणून आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते, आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. 

तुम्हाला जर आयुष्यात कायम सुख उपभोगायचे असेल तर त्याची सुरुवात आता या क्षणापासून होऊ शकते. ते म्हणजे कधी खोटे कर्म करू नका, कुणाचे वाईट चिंतू नका, कुणाला वाईट वागणूक देऊ नका, कुणाची फसवणूक करू नका हे सर्व मोफत असलेले विचार जर अंगीकारले तर सुख तुमच्या चरणाशी सदैव वास करेल.. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहत आयुष्यात पुढे वाटचाल करत राहा. 

 

Web Title: Which is absolutely beautiful.!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.