घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 06:18 PM2020-10-29T18:18:56+5:302020-10-29T18:20:37+5:30

देव भक्तवत्सल आहे तर संत दीनवत्सल आहेत. देवापेक्षाही संतांची श्रेष्ठता अगाध आहे. त्यांचे औदार्यही श्रेष्ठ आहे..!

When take then give, God is so generous ..! | घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार..!

घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार..!

googlenewsNext

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

संतश्रेष्ठ नामदेव महाराज देव आणि संत यांच्या औदार्याची तुलना करतांना म्हणतात, देवा..! तुझ्यापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत कारण दान देतांना, कृपा करतांना संतांजवळ आपपर भाव नाही. तू मात्र कसा आहेस..? तर -

घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार ।

अरे.! देवा तू सुदाम्याला सुवर्णनगरी दिली हे खरे पण; पहिल्यांदा तू त्याच्या जवळचे पोहे घेतलेस हे ही तितकेच खरे..! संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर रोखठोक देवाला विचारतात -

उदाराचा राणा म्हणविसी आपण ।
सांग त्वा कवणा काय दिले ॥

अरे..! तूं कुणाला काय दिलेस ती यादी तर मला सांग..? तुझ्यापेक्षा संतांकडे बघ. दधिची ऋषींनी स्वतः आत्मसमर्पण करुन स्वतःची हाडे इंद्राला वज्र तयार करण्यासाठी दिली. बरं जाऊ दे.. देण्याघेण्याचा व्यवहार आपण बाजूला ठेवू. तू स्वतःला देव म्हणवतोस ना.. मग तुझ्याजवळ समत्वदृष्टी तरी कोठे आहे..? तुझ्याजवळ आपपर भाव आहे.

भक्ता राखे पायापाशी । दुर्जनांसी संहारी ॥

तू प्रतिपाळ करतोस तो फक्त भक्तांचा.. दुर्जनांचा मात्र तू नाशच केल्याच्या कथा पुराणांत वर्णन केल्या आहेत. हा सज्जन, हा दुर्जन हा भेदभाव संतांजवळ कुठे आहे..? ते तर दुर्जनांचाही उद्धारच करतात. नारदांना ठार मारावयास निघालेल्या वाल्या कोळ्याचा नारदांनी उद्धारच केला ना..? तो वाल्याचा वाल्मिकी झाला तोच मुळी नारदांसारख्या संतांच्या कृपेमुळे..! उलट पापी, दुराचारी, खल माणसाबद्दल तर संतांच्या मनांत अधिक जिव्हाळा, प्रेम असते. ते देवाजवळ प्रार्थना करतात -

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

तुकाराम महाराज देखील हाच दाखला देतात -

पुनीत केले विष्णुदासी । संगे आपुलिया दोषी ॥

बरं देवा..! एखादा भक्त तुझी उत्कट भक्ती करुं लागला तर त्याला तूं प्रसन्न होऊन वरदान देतोस.. वरदान देतांना त्यात भक्ताचे कल्याण आहे की अकल्याण आहे याचा कुठलाही विचार तुझ्याजवळ नसावा का रे..?

हिरण्यकश्यपूने वर मागितला, 'मला मृत्यू नको..!' तूं त्याला 'तथास्तू' म्हटलेस.. अरे.! निसर्ग नियमाच्या विरुद्ध असणारा असा हा वर तूं देतोसचं कसा..? संत मात्र असे नाहीत बरं..! ते सच्च्या भक्ताचे कल्याणच करतात. त्याला जन्म मरणाच्या भवचक्रातून तर मुक्त करतातच परंतु 'मी ब्रह्म आहे' या अनुभवस्थितीला नेतात. संतसम्राट ज्ञानदेव महाराज म्हणतात -

कृपाकटाक्षे न्याहाळिले । आपुल्या पदी बसविले ।
बाप रखुमा देविवरु विठ्ठले । भक्ता दिधले वरदान ॥

तात्पर्य काय..? तर, देव भक्तवत्सल आहे तर संत दीनवत्सल आहेत. देवापेक्षाही संतांची श्रेष्ठता अगाध आहे. त्यांचे औदार्यही श्रेष्ठ आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
 

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: When take then give, God is so generous ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.