काय संबंध असतो एखाद्या गेलेल्या व्यक्तीचा आणि विशिष्ट वृक्षाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:55 AM2020-05-25T11:55:02+5:302020-05-25T12:13:41+5:30

कल्पवृक्ष हा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे हा देखील असाच एक समज आहे. या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्यावेळी जी चौदा रत्न निघाली त्यावेळी झाली अशी आख्यायिका आहे.

What is the relationship between a birth death and a tree | काय संबंध असतो एखाद्या गेलेल्या व्यक्तीचा आणि विशिष्ट वृक्षाचा?

काय संबंध असतो एखाद्या गेलेल्या व्यक्तीचा आणि विशिष्ट वृक्षाचा?

googlenewsNext
ठळक मुद्देअजान वृक्षाची काठी श्री ज्ञानेश्वरांनी समाधीच्या वेळी बाजूला ठेवली आणि त्यापासून अजानवृक्ष वाढला, अशी आख्यायिका आहे.प्लेटोने आत्मा अमर असे म्हटले होते आणि त्याचा संबंध अनेक वर्ष जगणाऱ्या झाडांशी जोडला गेला आहे.

>> डॉ.स्वाती गाडगीळ

संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथे समाधी घेतली. त्या समाधीवर अजान वृक्ष आहे. कबरस्तानातही सायप्रेस किंवा यू (सदापर्णी) चे झाड आढळते. जन्म, मृत्यू, आत्मा, परमात्मा या सगळ्याशी निगडीत वृक्ष असू शकतात हे मुळातच श्रद्धेवर आधारित विधान आहे. भारतीय पुराणात उल्लेख असलेला आणि समुद्रमंथनातील चौदा रत्नांपैकी एक म्हणजेच कल्पवृक्ष. याचा उल्लेख बौद्ध, जैन पुराणात आढळतो. इतर काही धर्मातही त्याचा उल्लेख वेगळ्याप्रकारे आढळतो. इथून तिथून माणूस सारखाच आणि त्याच्या आयुष्यात येणारे जन्ममृत्यूही सारखेच. या जन्म आणि मृत्यूशी नातं असलेले, धर्म - अधर्माची जाणीव करून देणारे, इच्छित फळ देणारे आणि मृत्यूनंतरही आपली आठवण जपणारे हेच ते वृक्ष.
-------------------

संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेतील एक सुवर्णपर्व. संत ज्ञानेश्वरांनी नेवाश्याला ज्या खांबाला टेकून लिखाण केलं तो पैस खांब. त्याला स्पर्श करताच दिव्यत्वाची प्रचिती होते. श्रीक्षेत्र आळंदी येथे त्यांच्या समाधीवर असलेला अजान वृक्ष त्यांच्या कार्याचा, त्यांच्या महान काव्याचा आणि त्यांच्या अनंतात एकरूप होण्याचा साक्षीदार आहे. एहरेशिया लेविस या जातीचा हा वृक्ष . अजान वृक्षाची काठी श्री ज्ञानेश्वरांच्या हातात असे. ती समाधीच्या वेळी त्यांनी बाजूला ठेवली आणि त्यापासून अजानवृक्ष वाढला अशी आख्यायिका आहे. तोच विस्तारलेला वृक्ष त्यांच्या समाधीस्थळी आहे. या वनस्पतीची पाने व फळे मृत्यूवर मात करण्याचे सामर्थ्य देतात असा उल्लेख श्री एकनाथ महाराजांनी केला आहे. या पवित्र वृक्षाच्या छायेत बसून वाचन केल्यास दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असे मानतात. भाविक त्याला प्रदक्षिणा घालतात. हा वृक्ष अजान का तर त्यावेळची जनता अजाण होती, म्हणून हे नाव पडलं असे म्हणतात. त्या अजाण लोकांना ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमधून शहाणपणाचा मार्ग दाखवला, वयाच्या सोळाव्या वर्षी भगवद्गीता मराठीत समजावून सांगितली. अशा या थोर संताच्या समाधीपाशी अजान वृक्ष आहे. काय संबंध असतो एखाद्या गेलेल्या व्यक्तीचा आणि वृक्षाचा.

सध्याच्या परिस्थितीत, जगभर मृत्यूचे थैमान सुरू असताना साहजिकच मृत्यूविषयी अनेक प्रकारचे विचार सतत मनात येत असतात. काही उतारा सापडतो आहे का यासाठी सगळं जग प्रयत्न करीत आहे. दक्षिण भारतात रूग्ण सेवा देऊन जीव गमावलेल्या एका डॉक्टरला शेवटी सहा बाय दोनची जागा मिळू नये यासारखी शोकांतिका नाही. अनेक वेगवेगळ्या विचारांनी मी बेचैन झाले. मृत्यूनंतर ज्या धर्मात अग्नी न देता केवळ मातीमध्ये विलीन होण्यासाठी तो देह जमिनीत सहा फूट खाली दफन केला जातो, त्या ठिकाणी त्या व्यक्तीची आठवण म्हणून कधी संगमरवरी स्मारक उभारण्यात येते , कधी त्याच्या जवळ एखादे झाड लावले जाते. कबरस्तानातही बहुतेक सायप्रेस (सुरूचे सदाहरित झाड) नाही तर यू (गर्द हिरव्या रंगाची पाने असलेला सदापर्णी वृक्ष ) हे वृक्ष आढळतात. प्राचीन ग्रीक संदर्भात असे सापडते की, प्लेटोने आत्मा अमर असे म्हटले होते आणि त्याचा संबंध बारा महिने हिरव्यागार राहणाऱ्या आणि अनेक वर्ष जगणाऱ्या झाडांशी जोडला गेला आहे. सदैव हिरवा राहणारा हा वृक्ष अंत्यविधी आणि आत्म्याच्या अमरत्वाची ग्वाही देतो.

सायपॅरिसस नावाचा एक देखणा ग्रीक तरूण होता. त्याच्या हातून एकदा त्याने पाळलेलं हरीण मारलं गेलं. तो गहिवरून देवाला म्हणाला, कसेही करून कायम त्या हरणाची आठवण राहील असा उपाय सांग. अपोलो देवाने त्या मृत हरणाचे रूपांतर एका सायप्रेस झाडामध्ये केले. तेव्हापासून सायप्रेस ट्री मृत्यू आणि दु:खाचा सोबती झाला. हे वृक्ष दोन जातीचे असतात. एक लेलॅण्ड सायप्रेस ज्याचे आयुष्य २० ते २५ वर्षे असते, तर दुसरा बॉल्ड सायप्रेस (टक्कल झाड). बॉल्ड सायप्रेस हजारो वर्ष जगू शकतो. ईशान्य अमेरिकेत २६२६ वर्ष जुनं झाड आहे. टॅक्सोडियम डिस्टिकम हे त्याचं वनस्पती शास्त्रातील नाव आहे . हजारो वर्ष जगणारा आणखी एक वृक्ष जो इंग्लंड मधील कबरस्तानांमध्ये आढळतो तो म्हणजे यू. हळूहळू वाढणाऱ्या या वृक्षाची जास्तीत जास्त उंची दहा मीटर एवढी असते. या दोन्ही वृक्षांना फळं येत नाहीत. यू झाडाचं बी एका हलक्या लाल रंगाच्या कातड्यासारख्या पानात गुंडाळलेलं असतं. हा कातड्यासारखा भाग सोडल्यास बाकी सगळं विषारी असतं. बी , पानं , साल गुरांनी खाल्ली तर त्यांचा विषबाधेने मृत्यू होतो.

जन्म, मृत्यू, आत्मा, परमात्मा या सगळ्याशी निगडीत वृक्ष असू शकतात हे मुळातच श्रद्धेवर आधारित विधान आहे, नाही का ? कल्पवृक्ष हा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे हा देखील असाच एक समज आहे. या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्यावेळी जी चौदा रत्न निघाली त्यावेळी झाली अशी आख्यायिका आहे. हा वृक्ष इंद्राने घेतला. पारिजातकाला देखील कोणी कल्पवृक्ष म्हणतात. स्वर्गातील मंदार, पारिजात, संतान, कल्पवृक्ष व हरिचंदन हे पंचदेवतरू आहेत. भारतीय पुराणात याचा उल्लेख आहे तसाच बौद्ध, जैन पुराणातही आहे. ख्रिस्ती व इस्लाम या धर्मातही कल्पवृक्षाचा उल्लेख वेगळ्या प्रकारे आढळतो . आश्चर्य वाटले ना ! अहो, इथून तिथून माणूस सारखाच, नाही का ! हिंदूंमध्ये असे मानतात की सुवर्णाचा कल्पवृक्ष दान केल्यास ते महादान मानले जाते आणि त्याने पापाचा विनाश होतो. हा वृक्ष कुरु प्रदेशात वाढतो. त्याच्या खोडावर वेटोळे घातलेला सर्प असतो, असे वर्णन मानसार या ग्रंथात आढळते. जन्म आणि मृत्यूशी नातं असलेले वृक्ष, धर्म - अधर्माची जाणीव करून देणारे वृक्ष, इच्छित फळ देणारे वृक्ष आणि मृत्यूनंतरही आपली आठवण जपणारे वृक्ष ! निसर्ग सुंदर आहे आणि तितकाच गूढ आहे.

(संकलन : स्नेहा पावसकर)

Web Title: What is the relationship between a birth death and a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.