नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 01:00 PM2020-12-03T13:00:00+5:302020-12-03T13:00:02+5:30

नामात प्रेम कसे येईल याचा विचार न करता नाम कसे घेता येईल, याची विचार झाला पाहिजे. 

True warmth is required for love of Nama to come- Brahmachaitanya Gondwalekar Maharaj | नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

googlenewsNext

नामात प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला, तर लक्षात येईल की हा प्रश्नच मूळात बरोबर नाही. मूल झाल्याशिवाय बाईला, मूलाबद्दल प्रेम कसे येईल? मूल झाले, की आपोआप त्याबद्दल प्रेम तिच्या मनात उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, 

बाळा दुग्ध कोण, करितो उत्पत्ती,
वाढवे श्रीपती सवे दोन्ही!

बाळाची चाहूल लागताच, भगवंत त्याच्या भूकेची सोय आधी लावून देतो आणि बाळासकट आईचीही काळजी घेतो. त्याप्रमाणे मुलाबद्दल प्रेम कसे वाटेल, हा विचार आधीच करणे अनाठायी आहे. त्यापेक्षा मूल कसे होईल, हा विचार सयुक्तिक ठरेल. अशाच प्रकारे नामात प्रेम कसे येईल याचा विचार न करता नाम कसे घेता येईल, याची विचार झाला पाहिजे. 

हेही वाचा : 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

मुखी नाम घेण्यासाठी कोणाची आडकाठी आहे? तर दुसीऱ्या कोणाची नसून आपल्या स्वत:ची! नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल, तर दोष दुसऱ्याचा नसून स्वत:चाच आहे. नाम घेणे हे आपले काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्म आहे. 

आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा निराळा असूच शकत नाही. तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. यावरून एक गोष्ट अशी ठरली, की प्रेम का येत नाही, याचे उत्तर आमच्याजवळच आहे, ते म्हणजे `नाम घेत नाही म्हणून!'

यावर कोणी असे म्हणेल, की आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही? हे विचारणे ठिक आहे. पण आता आम्ही जे नाम म्हणून घेतो, त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्मलेल्या बाळाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण नाम घेतो. विंâवा दुसरे काही करायला नाही म्हणून नाम घेतो. अर्थात असे नाम घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण `प्रेम का येत नाही' असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूरी आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले, तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिती होते, तीच नामाच्या बाबतीत आपली होणे जरूरी आहे. 

आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे. ती कळली, तर सर्वकाही फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच जास्त कठीण असते. ज्याला मी काही तरी झालो, असे वाटते, तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने स्वत:ला फारच सांभाळले पाहिजे. अखंड नामस्मरण हाच नामावर प्रेम येण्याचा अंतिम पर्याय आहे.

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज

Web Title: True warmth is required for love of Nama to come- Brahmachaitanya Gondwalekar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.