‘तोरा मन दर्पण कहलाये’...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 07:31 PM2020-06-27T19:31:36+5:302020-06-27T19:31:42+5:30

दर्पणासमान असलेले मन आपणास सर्वकाही दाखविते.

‘Tora man darpan kahalaye’ ...! | ‘तोरा मन दर्पण कहलाये’...!

‘तोरा मन दर्पण कहलाये’...!

googlenewsNext

-‘तोरा मन दर्पण कहलाये’ म्हणजेच मनुष्याचे मन हेच दर्पण आहे. दर्पणासमान असलेले मन आपणास सर्वकाही दाखविते. म्हणूनच ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण’ हे समर्थ रामदास म्हणतात ते काही खोटं नाही.
जीवनातील चढ-उतार दैवी महापुरुषांना, ज्ञानी संत-माहात्म्यांना चुकले नाहीत,  थोडक्यात सांगायचं तर, अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील मृगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. त्यामुळे, अडचणींच्या ओझ्याखाली ‘मन’मारुन जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा ‘मना’पासून प्रयत्न करायला हवा. मनाची ताकद फार मोठी आहे. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मनापासून केलेलं कोणतेही कार्य सिद्धीस जाते. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असायला हवं. मनाची प्रसन्नता लढण्याची सकरात्मक शक्ती आपल्या पाठीशी उभी करते. म्हणून तर संत महात्म्यांनी मनाला आवर घालून त्याला प्रसन्न करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे.
‘जे मागतात शक्ती, आभाळ पेलण्याची...
देते त्यास आई, उंची हिमालयाची...’

म्हणजेच आभाळ पेलण्याची शक्ती मागणाºयांच्या कवेतच हिमालयाची उंची असते. मात्र,  स्पर्धेच्या युगात वावरताना, जीवनात सातत्याने धडपड करताना, माणूस इतरांशी मनमोकळं बोलणं सोडा, माणसं स्वत:शी ही बोलत नाहीत. नुसती स्पर्धा आणि पैशाची हाव, यातच तो गुरफटून गेलाय. कधी आपण आपल्या अपयशाने खचुन जातो, तर कधी दुसºयाच यश पाहून आपल्याला मनस्ताप होतो. काय करावं? याबाबतही अनेकांचा नुसताच गोंधळ आहे.  या ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनशैलीमुळे कित्येकांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली तर ठीक, नाहीतर होणाºया मनस्तापामुळे अनेकजण खचून जातात. वेडावाकडा निर्णय घेतात. आज वाढलेल्या आत्महत्येच्या संख्येमागे मनस्ताप हेच प्रमुख कारण आहे. अगदी बंद खोलीतील रोल मॉडेल (सिनेमातील नट)ही याला अपवाद नाहीत. मनाला चटका लावणाºया अनेक गोष्टी आपल्या अवती भवती घडत असतात.
मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेलं योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, ही गोष्ट खरी असली तरी सोपी नक्कीच नाही.
आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर म्हणतात की, प्राचीन ऋषींनी सांगितले आहे , ‘श्रवण’ आधी ऐका आणि मग ‘मनन’ म्हणजे विचार मंथन करा. मग ते अंगीकारा. कुणीतरी काही म्हटले म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. त्याचबरोबर कुणी काही म्हटलेले झिडकारूनही टाकू नका. गीतेतील सर्व ७०० श्लोक सांगून झाल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, ‘ विचाराचे स्वातंत्र्य, मताचे स्वातंत्र्य, विश्वास आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य द्यायची गरज आहे. म्हणूनच आधी ऐका आणि त्यावर विचार मंथन करा, मग तो तुमचा स्वत:चा अनुभव बनेल. मग तो सूज्ञपणा बनतो.

- शून्यानंद संस्कारभारती
खामगाव.

Web Title: ‘Tora man darpan kahalaye’ ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.