स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 12, 2020 06:22 PM2020-10-12T18:22:59+5:302020-10-12T18:35:34+5:30

मानसिक उत्क्रांती व्हावी, हा स्वामींचा उपदेश आहे आणि तोच प्रत्यक्षात आणणे हा अक्कलकोट संस्थानाचा प्रयत्न आहे.

Swami Samarth says, be 'Samarth'! -Dr. Rajimwale. | स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण

स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय अध्यात्म हे धार्मिकतेत अडकवणारे नसून तत्त्वज्ञानाकडे नेणारे आहे. तुमच्यातही 'समर्थ' होण्याचे सामर्थ्य आहे.दरदिवशी स्वत:ला नवनवीन आव्हान द्या आणि हे जग तुमच्या प्रयत्नांनी सुंदर बनवा.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'स्वामी समर्थ यांच्या चरित्रात अनेक चमत्कारिक प्रसंग आढळतात. परंतु, केवळ चमत्कारात न अडकता, प्रत्येकाने 'समर्थ' व्हावे आणि आपल्या आयुष्यात चमत्कार घडवावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे', सांगत आहेत डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले. 

अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतित केले. १० ऑक्टोबर रोजी 'लोकमत भक्ती' या युट्यूब चॅनेलवरून अभिनेत्री गिरीजा ओक यांच्याशी संवाद साधत त्यांनी स्वामीभक्तांना मार्गदर्शन केले. 

हेही वाचा: Swami Samarth Story: लाकूडतोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली अन् भक्तांच्या कल्याणासाठी स्वामी समर्थ प्रकटले!

डॉ. राजीमवाले सांगतात, 'मानसिक उत्क्रांती व्हावी, हा स्वामींचा उपदेश आहे आणि तोच प्रत्यक्षात आणणे हा अक्कलकोट संस्थानाचा प्रयत्न आहे. संस्थेतर्फे अग्निहोत्र, योग, वेद यांचा प्रचार ६५ देशातून होत आह़े' 

भारतीय अध्यात्म हे धार्मिकतेत अडकवणारे नसून तत्त्वज्ञानाकडे नेणारे आहे. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचे ज्ञानामृत पाजत आहेत. स्वत: न लढता अर्जुनाला लढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. स्वामी समर्थ देखील आपल्या शिष्यांना तेच सांगतात, 'चमत्कार होईल याची वाट बघत बसू नका. जो प्रयत्नवादी असतो, त्यालाच यश मिळते. तुमची लढाई तुम्हाला जिंकायची आहे. तुमच्या अडीअडचणीत कोणीही मदतीला येणार नाही. यासाठी तुम्हाला 'समर्थ' व्हायचे आहे. तुमच्यातही 'समर्थ' होण्याचे सामर्थ्य आहे, फक्त तुम्ही स्वत:ला आजमावून पाहत नाही. स्वत:ला मर्यादेच्या चौकटीत अडकवून ठेवू नका. जग अमर्याद आहे. तुम्हाला बरेच काही शिकायचे आहे, अनुभवायचे आहे. थोडक्यात समाधान मानू नका. मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेवा आणि पूर्ण करा. दरदिवशी स्वत:ला नवनवीन आव्हान द्या आणि हे जग तुमच्या प्रयत्नांनी सुंदर बनवा. एवढे प्रयत्न करूनही, जर कधी एकटेपणा वाटलाच, तर 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.'

हे समर्थ विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. राजीमवाले योग, वेद आणि अध्यात्म यांचा वापर करतात. ते सांगतात, 'कोव्हीड काळात अनेक तोटे झाले, तसे फायदेही झाले. सतत बाहेर किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणारा मनुष्य, स्वत:च्या आयुष्यात डोकावायला शिकला. स्वत:शी संवाद साधायला शिकला, स्वत:कडे तटस्थपणे बघायला शिकला. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. इतके दिवस आपण सगळेच मुखवटे लावून फिरत होतो. आपण समाजाला कसे दिसलो पाहिजे, तसे दाखवत होतो. परंतु, आता बघायला कोणी नाही म्हटल्यावर खोटे मुखवटे आपोआप गळून पडले. माणूस वास्तववादी बनला. प्रयत्नवादी बनला. स्वत: स्वीकारायला शिकला. हेच खरे आध्यात्म आहे. आध्यात्म म्हणजे स्वउन्नतीचा मार्ग. तो त्याला कोव्हीडमुळे मिळाला आहे. एकूणच, देवभोळेपणाकडून तत्त्वज्ञानाकडे आपला प्रवास सुरू आहे, ही सकारात्मक बाब आहे.'

या काळात अनेक जण तणावग्रस्तदेखील झाले. त्याचे कारण म्हणजे, बालपणापासून आपल्याला एकट्याला बसण्याची सवय लागू दिलेली नसते. मुल एकटे दिसले, की चारचौघात त्याने बसायला हवे, हा नियम केला जातो. स्वत: बरोबर वेळ घालवायला आपल्याला शिकवलेच गेले नाही. विपश्यना केंद्रात जे धडे दिले जातात, ते लॉकडऊन काळात आपोआप मिळाले. मात्र, स्वत:शी संवाद साधताना आपली नकारात्मक बाजूही समोर आली. ती स्वीकारून ज्यांनी नकारात्मकतेवर मात केली, ते पुढे गेले आणि जे स्वीकारू शकले नाहीत, ते नैराश्यात गेले. त्यामुळे मानसिक ताण वाढला. हा रोग कोरोनापेक्षा भयंकर आहे. त्यावर वेळच्या वेळी उपचार मिळायला हवा. 

हेही वाचा : त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा... श्री दत्त उपासनेचे माहात्म्य

मनस्वाथ्य टिकवण्यासाठी मोबाईल अ‍ॅपला जसे फिल्टर लावतो, तसे मनाला फिल्टर लावून घेण्याची सवय लावावी. त्यामुळे अनावश्यक माहितीचा साठा तयार होत नाही आणि आपल्या आवडत्या गोष्टीत मन रमवण्यासाठी भरपूर मोकळीक मिळते. आपण तंत्रयुगात जगत आहोत, भविष्यातही अनेक बदलांना आपल्याला सामोरे जायचे आहे, अशावेळी मन तजेलदार ठेवण्याचे उपाय आतापासून अनुसरायला हवेत. त्यासाठी स्वामींच्या उपदेशानुसार योग, अध्यात्म आणि वेद यांचा जरूर अभ्यास करावा.

Web Title: Swami Samarth says, be 'Samarth'! -Dr. Rajimwale.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.