‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:53 AM2020-07-02T01:53:29+5:302020-07-02T07:03:41+5:30

महेश काळे यांच्या स्वरचैतन्याने घरबसल्याच भाविकांना वारीची अनुभूती मिळाली. ‘बोलावा विठ्ठल’,  ‘विष्णुमय जग’, ‘जाता पंढरीसी’, ’संतभार पंढरीत’ अशा एकसे बढकर एक भक्तिरचनांद्वारे मैफलीने कळसाध्याय गाठला

Sound of Vithuraya vision from 'Abhangaranga'; Online Wari in the magical tone of Mahesh Kale | ‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

googlenewsNext

पुणे : चराचरात भरून राहिलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची स्वरानुभूती ‘लोकमत’च्या ‘अभंगरंग’ या ऑनलाइन कार्यक्रमातून भक्तांना मिळाली. महेश काळे यांच्या जादुई स्वरांनी भाविकांना वारीदर्शन घडविले. विठूनामाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन गेले.

लोकमत माध्यम समूह आयोजित आणि संतोष बारणे प्रस्तुत (सिल्व्हर ग्रुप) आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (३० जून) महेश काळे यांच्या अभंगवाणीतून भक्तिरसाचा जणू मळाच फुलला. द आराहना रोझरी फाउंडेशन पुणेच्या सहयोगाने ही मैफल रंगली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंग-रखमाईला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह राज्यभरातून पालखी सोहळ्यांनी मंगळवारी प्रस्थान ठेवले.

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या टाळ-मृदंगाची साथ नव्हती. मात्र, ‘लोकमत’च्या अभंगरंगातून महेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जादुई स्वरांच्या बरसातीत व्हर्च्युअल वारीचे दर्शन घडले. देहू-आळंदीतील प्रस्थानापासूनच्या प्रथा-परंपरांचे दर्शन घडवत ही जादुई मैफल सुरू होती. संपूर्ण जगभरातून भाविक यामध्ये सहभागी झाले होते. लाखांहून अधिक भाविकांनी ‘लोकमत’च्या ऑनलाइन सोहळ्यावर कौतुकाची पखरण केली आणि ‘लोकमत’च्या टीमसह महेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुफळ झाले.

भाविकांनी अनुभवले भक्तिरसाचे चैतन्य
महेश काळे यांच्या स्वरचैतन्याने घरबसल्याच भाविकांना वारीची अनुभूती मिळाली. ‘बोलावा विठ्ठल’,  ‘विष्णुमय जग’, ‘जाता पंढरीसी’, ’संतभार पंढरीत’ अशा एकसे बढकर एक भक्तिरचनांद्वारे मैफलीने कळसाध्याय गाठला. ‘अबीर गुलाला’चे रंग उडवीत वारीचा तो चैतन्यमयी सोहळा रसिकांनी सुरांमधून अनुभवला. ‘वारी’ म्हणजे नक्की आहे तरी काय तर विवेकाच्या मार्गाने अर्थ शोधणारी एक शक्ती आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा खळाळता प्रवाह वारीतून अनुभवायला मिळतो, अशा सुंदर शब्दांत योगेश देशपांडे यांनी या मैफलीचे विवेचन केले.

विठूनामाचा ऑनलाइन गजर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. मीही वारकरी असून माझे कुटुंब वारीमध्ये सहभागी होत असते. यंदा कोरोनामुळे पंढरीच्या वारीमध्ये जरी खंड पडला असला, तरी लोकमतच्या सहकार्याने ही ऑनलाइन वारी रसिकांसमोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. - संतोष बारणे, सिल्व्हर ग्रुप

कोरोना संकटाच्या काळातही महाराष्ट्राच्या वारीच्या अद्वितीय परंपरेला ‘अभंगरंग’मधून जपण्यात आले. भाविकांची विठ्ठलदर्शनाची आस पूर्ण झाली. लाखो भाविकांच्या कौतुकाच्या पखरणीत रंगलेल्या या सोहळ्यात रोझरी फाउंडेशनच्या सहभागाचा आनंद आहे. - विनय अरहाना, रोझरी फाउंडेशन

Web Title: Sound of Vithuraya vision from 'Abhangaranga'; Online Wari in the magical tone of Mahesh Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.