हसरे चेहरे आनंदी असतातच असे नाही; खरा आनंद मिळवण्यासाठी.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 04:45 PM2021-11-27T16:45:15+5:302021-11-27T16:45:43+5:30

चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. 

Smiling faces are not always happy; To find true happiness .... | हसरे चेहरे आनंदी असतातच असे नाही; खरा आनंद मिळवण्यासाठी.... 

हसरे चेहरे आनंदी असतातच असे नाही; खरा आनंद मिळवण्यासाठी.... 

googlenewsNext

सद्यस्थितीत प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे. तणाव त्यांना येतो, जे शरीराला, मनाला थोडीही विश्रांती देत नाहीत. स्वत:ला सतत कामात गुंतवून घेतात. कामात असणे केव्हाही चांगले, परंतु कामाचा अतिरिक्त ताण मनाला त्रासदायक ठरतो. 

कोणतेही काम करताना आनंद मिळत असेल, तर त्या कामाचा ताण येत नाही. याउलट ताण घेऊन केलेल्या कामातून कधीच आनंद मिळू शकत नाही. ज्ञान आणि ध्यान, काम आणि आराम हे जीवनरथाचे दोन चक्र आहेत. पैकी एकही चाक निकामी झाले, तर जीवनरथ चालणार नाही. परंतु, हे लक्षात न घेता अलीकडे एका रथावर जीवनरथ ओढण्याचा लोकांचा अट्टहास सुरू आहे. 

चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. 

एकदा एक मनुष्य अशांत मनावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला विविध उपाय सांगितले. संगीत ऐक, पुस्तक वाच, चित्रपट बघ. तो मनुष्य म्हणाला, मी सगळे उपाय करून पाहिले, तरी मन रमेना. त्यावर डॉक्टर म्हणाले, जवळच्या नाट्यगृहात एक छान हास्यविनोदाचा कार्यक्रम सुरू आहे असे ऐकले आहे, तो ऐकून या, अनेक लोकांना त्याचा फायदा झाला असे ऐकले. तुम्हीही जाऊन या, तुम्हाला बरे वाटेल.' यावर तो मनुष्य डॉक्टरांना म्हणाला, `डॉक्टर, तो कार्यक्रम मीच सादर करतो.' तात्पर्य, हसणारे चेहरे आनंदी असतीलच असे नाही. म्हणून मन शांत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

सद्यस्थितीत जगभरात सर्वात जास्त रुग्ण असतील, तर ते मानसकि आजाराचे. या आजारावर ठराविक औषधेही नाहीत. मानसोपचार तज्ज्ञ समजूत काढू शकतील, परंतु, मनाची जडण घडण ही प्रत्येकाला स्वत:लाच करावी लागते आणि ती केलीही पाहिजे. शरीर स्वास्थ्याची आपण काळजी घेतो, तशी मन:स्वास्थ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोणतेही कारण आपले मन अस्थिर करू शकत नाही, जोवर आपण ते मनाला लावून घेत नाही. मात्र, बारीक सारीक गोष्टींचा विचार मन:शांती हिरावून घेऊ शकतो. मन अस्थिर तेव्हाच होते, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते. परंतु, दर वेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत, हे आपल्यालाही माहित असते. तरीदेखील आपण अकारण अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, की खेद करतो. 

मनशांती शोधायला जाऊ नका. मन शांतच असते. एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे. आपणच त्यात खडा टाकून त्यात अस्थिरता निर्माण करतो. ती शांतता अबाधित ठेवण्यासाठी, कोणत्या विषयांना किती महत्त्व द्यायचे, कोणत्या आठवणी किती काळ मनात ठेवायच्या, कोणाचे बोलणे मनाला लावून घ्यायचे या गोष्टींची मनाशी आखणी करायला हवी. तरच, मन कायमस्वरूपी शांत आणि आनंदी राहू शकेल.

Web Title: Smiling faces are not always happy; To find true happiness ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.