उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 3, 2020 04:31 PM2020-11-03T16:31:40+5:302020-11-03T16:32:54+5:30

भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतीत नाही. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील.

Should Ganpati of right sond be kept in the house or not? What does the shastra say? | उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

सरसकटपणे आपण डाव्या सोंडेचा गणपती पाहिला आहे. अशातच मूर्तीकाराकडून एखादी मूर्ती चुकून उजव्या सोंडेची बनवली गेली असेल, तरी त्यातले देवत्त्व अजिबात कमी होत नाही. मनोभावे केलेली पूजा बाप्पापर्यंत पोहोचते. मग तो उजव्या सोंडेचा असा नाहीतर डाव्या सोंडेचा!

पूर्वापार चालत आलेल्या उजव्या सोंडेच्या मूर्तीच्या आराधनेमागे असलेली भक्ती बऱ्याचदा प्रेमापोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अनेक अपसमजुती प्रचलित होतात. उदा. कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो, सिद्धिविनायक घरात ठेवू नये, उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो. अशा अनेक अंधश्रद्धा प्रसूत होतात. ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे, तिथे काही वाईट अनुभव आल्याचे ऐकिवात नाहीत. योगायोगाने काही गोष्टी घडल्या, तर तो प्रारब्धाचा भाग असतो, यात उजव्या सोंडेच्या गणपतीला दोष देणे योग्य नाही. ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टींचे श्रेय आपण स्वतःकडे लाटतो, तशीच वाईट गोष्टींची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. याच बऱ्यावाईट घडामोडींना प्रारब्ध म्हणतात. 

हेही वाचा : पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

गणपतीच्या सोंडेचे अग्र याच्या उजव्या वरील हाताकडे वळले असल्यास तो सिद्धिविनायक व डाव्या वरील हाताकडे वळले असल्यस तो ऋद्धिविनायक समजला जातो. त्याचप्रमाणे सोंडेचे टोक त्याच्या उजव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो बुद्धिविनायक व डाव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो. 

या चार विनायकांपैकी सिद्धिविनायक मोक्षसिद्धिप्रद समजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात सूक्ष्म तपशीलात्मक असा फारसा ऊहापोह केलेला आढळत नाही. गनेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. त्यामुळे काही वृद्ध, जाणकार व नि:स्सिम गणेशभक्तांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून राहावे लागते. ज्या गणेशपंथी साधकांनी गणपती देवतेचा अतिसुक्ष्म विचार केलेला आहे, त्यांच्या मते गणेश व महागणपती या दोन भिन्न संकल्पना असून माता पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार आहे. तिने मृत्तिकेला आकार देऊन त्यात महागणपतीचे आवाहन केले. हा महागणपती म्हणजेच जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असलेले महातत्त्व आहे. महागणपतीनेच विविध प्रसंगी विविध प्रकारचे अवतार घेऊन  दुष्टांचा नायनाट केला. 

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा गणेशावतार व इतर सात महागणपती आहेत, असे म्हटले जाते. जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्षसिद्धिच्या प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते, तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे. अशावेळी पार्थिव गणपतीची आराधना केली जाते. या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाचे पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाची ध्यानवाहनपूर्वक षोडशोपचार पूजा व त्याचे लगेचच विसर्जन विहित असते. ही पूजा अत्यंत शुचिर्भुतपणे व तंतोतंत विधिविधानपूर्वक करणे आवश्यक असते.

भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतीत नाही. लेकरांप्रमाणे तो आपला सांभाळ करतो. सद्बुद्धी देतो. त्यात गणपती ही तर बुद्धीची देवता. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील.

बाप्पा मोरया!

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

Web Title: Should Ganpati of right sond be kept in the house or not? What does the shastra say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.