सुंदर ते ध्यान उभे विटेवरी; विठुरायाचं स्मरण करत म्हणूया 'जय हरी'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 23, 2020 07:00 AM2020-09-23T07:00:00+5:302020-09-23T08:00:35+5:30

तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वत: निर्गुण भक्ती केली. परंतु, समाजाला भगवंत दाखवायचा, तर तो सगुण रूपात असायला हवा, म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. 

Saint Tukaram Maharaj Abhang on Lord vitthal | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी; विठुरायाचं स्मरण करत म्हणूया 'जय हरी'

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी; विठुरायाचं स्मरण करत म्हणूया 'जय हरी'

googlenewsNext
ठळक मुद्देसंतरचना समजून घेणे अवघड. वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात.हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पाहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधिस्थ अवस्था होते. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

जय हरी माऊली. पंढरपुरच्या पांडुरंगाचा विषय निघाला, की जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग मुखी येतोच. काय प्रासादिक ओळी आहेत बघा. त्या गुणगुणताना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते. कसे आहे ते रूप?

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।
तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर,तेचि रूप।।
मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजीत।।
तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने।।

या शब्दांबरोबर लता दीदींचा दैवी आवाज कानात घुमला नसेल तरच नवल. त्याला सुंदर संगीत साज चढवला आहे, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पाहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधिस्थ अवस्था होते. 

तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वत: निर्गुण भक्ती केली. परंतु, समाजाला भगवंत दाखवायचा, तर तो सगुण रूपात असायला हवा, म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. 

विठुरायाच्या सान्निध्यात असणारे तुकोबा, या अभंगात वर्णन करताना सुंदर `ते' ध्यान म्हणत आहेत. `ते' ऐवजी `हे' हा शब्द त्यांना वापरता आला असता, परंतु त्यांनी सुंदर ते ध्यान असे म्हटले, या मागचा तर्क सांगताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर सांगतात, `पंढरीला भक्तांसाठी, घेऊनि कर कटी, भीमा निकटी' उभे राहिलेले हे सावळे परब्रह्म सगुण आहे. त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते. या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी `हे' ऐवजी `ते' हा शब्द वापरला असावा.' 

म्हणूनच कदाचित आपणदेखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असता, डोळे मिटून घेतो. किती हा विरोधाभास? ज्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत आपण ताटकळत उभे असतो, तो दर्शनाचा क्षण आला, `देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी' अशी अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो. कारण, आपल्या हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना, याची खात्री करून घेत असतो. ही तुलना, म्हणजेच तुकाराम महाराजांच्या लेखी `सुंदर ते ध्यान' आणि `सुंदर हे ध्यान' यातला फरक असेल.


 
संतरचना समजून घेणे अवघड. वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात. जसे की, वर केलेली शाब्दिक उकल. बाकी, उर्वरित अभंगात महाराजांनी त्यांना दिसलेला पांडुरंग कसा आहे, त्याचे वर्णन केले आहे. 

कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग, त्याच्या गळ्यात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसले आहे. असे सोज्वळ, सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते. त्याच्या कानात मत्स्य आकाराची कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ रत्न आहे. हे रूप सावळे असले, तरी हा सगळा श्रुंगार त्याला शोभून दिसत आहे. अशा रूपात विठ्ठलभक्त कायम रमू शकतो....!

विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते, तशीच आपलीही अवस्था ही अभंगवाणी ऐकून होते. चला तर मग, दिवसाची मंगलमय सुरुवात करुया, मुखाने `जय हरी विठ्ठल' म्हणूया...!

Web Title: Saint Tukaram Maharaj Abhang on Lord vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.