कवी कालिदास देत आहेत, आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:34 IST2020-11-30T17:33:22+5:302020-11-30T17:34:15+5:30
शेक्सपिअरच्या म्हणण्याप्रमाणे, 'जगाच्या रंगभूमीवरची आपण पात्रे आहोत, आपला रोल आला की भूमिका वठवायची आणि निघून जायचे. आपली भूमिका छोटी असो कि मोठी! नाटकाच्या रंगतदार स्वरूपात भर टाकणे, हे आपले काम!

कवी कालिदास देत आहेत, आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन!
'आयुष्य सुंदर आहे' असे आपण वाचतो, परंतु अनुभवतो, काही वेगळेच. मग इतरांच्या वाट्याला आलेले आयुष्य सुंदर असते, म्हणून त्यांना आयुष्य सुंदर दिसत असावे का? की आपल्याकडे सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे? की आपल्याच वाट्याला सुंदर आयुष्य आलेले नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी कवी कालिदास सुभाषित लिहितात,
त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते,
नाट्यं भिन्नरुचैर्यनस्य बहुधाप्येकं समाराधनम्
नाटक म्हणजे सर्व कलांचे रंगमंचावरील सादरीकरण. कोणीही यावे, नाटक पाहून खुष व्हावे. सर्वांचे एकाच वेळी मनोरंजन करते, ते नाटक.
जीवनातील विविध प्रकारचे अनुभव सगळ्यांनाच घेता येतात. इथे तर नानाप्रकारचे भेद याबाबतीत आड येतात. श्रीमंतांना गरिबीचे चटके अनुभवता येत नाहीत. तर गरीबांना श्रीमंती चोचल्यांचा अर्थ कळत नाही. माणसागणिक रुची निराळी. पण या जीवननाट्यात आपण कुठे प्रेक्षक असतो?
शेक्सपिअरच्या म्हणण्याप्रमाणे, 'जगाच्या रंगभूमीवरची आपण पात्रे आहोत, आपला रोल आला की भूमिका वठवायची आणि निघून जायचे. आपली भूमिका छोटी असो कि मोठी! नाटकाच्या रंगतदार स्वरूपात भर टाकणे, हे आपले काम! आनंद चित्रपटात कवि योगेश यांनी लिहिलेले मन्ना डे यांच्या आवाजात एक गाणे आहे,
जिंदगी कैसी है पहेली हाए,
कभी तो हसाए, कभी ये रुलाए!
हेही वाचा : दत्तदर्शनानंतर एकनाथ महाराजांची झालेली भावावस्था!
आयुष्य कधी हसवते, तर कधी रडवते. परंतु, आपण फक्त वाट्याला आलेले दु:ख कुरवाळत बसतो आणि सोनेरी क्षण गमावून बसतो. आपल्या वाट्याला सतत सुख येत राहिले, तर त्याची किंमत राहणार नाही. ज्याप्रमाणे ईसीजी मशीनवर आपली जीवनरेषासुद्धा चढ उतार दाखवत असते. ती सरळ झाली, तर आयुष्यच संपून जाईल. म्हणून त्या चढ उतारांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच आपल्या आयुष्यातील चढ उतारांनादेखील महत्त्व आहे.
आयुष्य हे जणू काही एक नाटक आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची वेगळी कथा, वेगळी व्यथा. रोजचे चढ उतार, सुख-दु:खं, आनंद-कलह अशा नवरांसांनी युक्त आहे. त्याच्याकडे नाटकाही संहिता म्हणूनच पाहिले पाहिजे. म्हणजे ते जास्त रोचक होईल. केवळ आपणच नाही, तर आपल्या आयुष्यात येणारे जाणारे लोकही आपल्या आयुष्याला नाट्यमय वळण देत असतात. आपल्या वाट्याला आलेल्या कथानकाचा आस्वाद घेतला, तर आपणही म्हणू, 'आयुष्य सुंदर आहे.'