Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 16, 2020 07:16 PM2020-10-16T19:16:14+5:302020-10-16T19:17:05+5:30

Navratri 2020 : माझी आई, बहीण ,बायको, मैत्रीण आनंदी असेल, सुरक्षित असेल, तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे, तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन.

Navratri 2020 : durge durgat bharti arti meaning! | Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

Next

ज्योत्स्ना गाडगीळ 

'दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी' ही आरती आपण आजवर कितीतरी वेळा म्हटली असेन. संगीतकार अजय-अतुल यांनी आरतीचे गाणे केले आणि त्याची मोहिनी अधिकच वाढली. उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होईल. घरोघरी देवीचे पूजन, स्तवन, कीर्तन होईल,त्यावेळेसही ही आरती म्हटली जाईल. देवीच्या अद्वितीय पराक्रमाचा आरतीरूपाने जयघोष होईल. ही पूजा केवळ आदिमायेची नाही, तर अखिल विश्वाला नवजीवन देणाऱ्या स्त्रित्वाची आहे. तिलाच समर्पित ही आरती...

दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी, 
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी,
वारी वारी जन्ममरणाते वारी,
हारी पडलो आता संकट निवारी।।

हेही वाचा : Navratri 2020: प्रभू श्रीरामांप्रमाणे आपणही नवरात्रीत सप्तशती पठण का केले पाहिजे, जाणून घ्या.

महिषासुर, शुंभ-निशुंभ, मधु-कैटभ अशा असंख्य दैत्यांचे पारिपत्य करणारी देवी जगदंबा, तुझा जयजयकार असो. तू दानवांचा नाश करून देवाला, मानवाला, अखिल विश्वाला तारून नेलेस, तशीच करूणा आमच्यावरही कर. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सोडव. आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटांचे निवारण कर.

त्रिभुवन भुवनी पाहता, तूज ऐसी नाही, 
चारी श्रमले परंतु, न बोलवे काही,
साही विवाद करिता पडिले प्रवाही,
ते तू भक्तालागी पावसी लवलाही।।

हे त्रिपुरसुंदरी, तुझ्या अलौकीक तेजावर भाळून खुद्द असूराला  तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस, तू शौर्याला, पराक्रमाला मानणारी आहेस. तू दैत्यांना युद्धात पराजित करण्याचे आव्हान दिलेस. त्यांनी तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश ओढावून घेतलास. तुझ्या कर्तबगारीची वर्णने आम्ही सप्तशतीत वाचली आहेत. ती वर्णन वाचताना आमची परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी थकली. आमच्या ठायी असलेले षडरिपूदेखील तुझ्यासमोर नतमस्तक झालेत, आता फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरदहस्त आमच्या शीरावर ठेव.

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा,
क्लेशापासून सोडी, तोडी भवपाशा,
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा,
नरहर तल्लीन जाहला पदपंकजलेशा।।

कोणतही मोठे संकट असो, परंतु त्यातून निघण्याचा मार्ग आईकडे असतोच. तू तर, समस्त विश्वाची जननी आहेस. तुझ्या नुसत्या सुदर्शनाने भक्तांना केवढातरी दिलासा मिळतो. तु सोबत आहेस, ही खात्री असली, की संकट, दु:खं, क्लेश यांना आयुष्यात थारा राहतच नाही. मन शांत झाले की भवपाशातून सोडवणूक करणेही सोपे जाते. आणि तरीसुद्धा आम्ही जर या मायाजाळात अडकून राहिलो, तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेसच. `अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा?' अतिशय तळमळीने, व्याकुळतेने, कृपाभिलाषी होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. ज्याप्रमाणे, लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही, तशीच भक्तांनाही तू नजरेआड गेलेली चालत नाही. एवढी तल्लीनता तुझ्या ठायी आलेली आहे.

तुझी प्रत्यक्ष भेट कधी होईल माहित नाही, तोवर मी माझ्या सभोवताली असलेल्या स्त्रिरूपातील तुझ्या अंशाचा नितांत आदर करेन. दुसऱ्यांना आदर करायला शिकवेन. माझी आई, बहीण ,बायको, मैत्रीण आनंदी असेल, सुरक्षित असेल, तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे, तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन.

हेही वाचा : Navratri 2020 : नवरात्रीत करा सप्तशतीमधील सिद्धमंत्रांचे पठण, भक्तिमय होईल वातावरण!

Web Title: Navratri 2020 : durge durgat bharti arti meaning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.