Navratri 2020 : जीवनात ज्ञान आणि तेज देणाऱ्या देवी शारदेचे आज आगमन!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 21, 2020 09:18 PM2020-10-21T21:18:34+5:302020-10-21T21:20:25+5:30

Navratri 2020 : आयुष्यात एकवेळ लक्ष्मी प्राप्त झाली नाही, तरी ठीक, परंतु सरस्वतीची आराधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण, विद्वानं सर्वत्र पूज्यते!

Navratri 2020: Arrival today of Goddess Sharade who brings knowledge and brilliance in life! | Navratri 2020 : जीवनात ज्ञान आणि तेज देणाऱ्या देवी शारदेचे आज आगमन!

Navratri 2020 : जीवनात ज्ञान आणि तेज देणाऱ्या देवी शारदेचे आज आगमन!

Next

ज्योत्स्ना गाडगीळ

नवदुर्गांमधील देवीचे प्रत्येक रूप काही ना काही शिकवण देणारे आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस. देवी सरस्वतीला आपण आवाहन केले आहे. उद्या तिचे पूजन करणार आहोत. सरस्वती माता आपल्या जीवनात असलेली जडता दूर करते. जीवनात तेजस्विता आणण्यासाठी तिची उपासना केली पाहिजे. खऱ्या सारस्वताने माता शारदेच्या मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे.

या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्रावृता,
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना,
या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्दैवै: सदा वंदिता,
सा मां पातु सरस्वती भगवती, नि:शेष जाड्यापहा।।

बालपणापासून आपल्या नित्य प्रार्थनेत या श्लोकाचा समावेश आहे, त्याचा अर्थही समजावून घेऊ.

हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

जी कुंद कळीसारखी, चंद्र, तुषार व मुक्ताहारासारखी धवल आहे, जिने शुभ्र वस्त्र परिधान केली आहेत. जिचे हात वीणारूपी  वरदंडाने शोभत आहेत. जी पद्मावर विराजित आहे. जिला ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्यासारखे मुख्य देव वंदन करत आहेत. अशी जडतेला दूर करणारी सरस्वती माता माझे रक्षण करो. 
सरस्वतीच्या उपासकाला सारस्वत म्हणतात. जो खरा सारस्वत असतो, तो देवी शारदेप्रमाणे आपले आचार, विचार नेहमी शुद्ध ठेवतो. देवी शारदेचे रूप आपल्याला रूपातून अनेक गोष्टींची शिकवण मिळते.

देवी कुंद कळीसारखी, चंद्रासारखी धवल आहे, शितल आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्ञानी माणसाने धवल असावे, परंतु त्याच्या विद्वत्तेला उग्रतेचा दर्प नसावा. त्याच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीला चंद्राप्रमाणे शितलता जाणवली पाहिजे. त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने अंधारावर मात केली पाहिजे आणि इतरांना मार्ग दाखवला पाहिजे. 

शारदेने शुभ्र वस्त्र परिधान केली आहेत. आपल्याला माहित आहेच, पांढरे कपडे घातले, की खूप जपावे लागते. कारण, कुठेही डाग लागण्याची भीती असते. मात्र, शारदेच्या शुभ्र वस्त्रातून संदेश मिळतो, की तिच्या उपासकाने आपल्या चारित्र्याला डाग लागू न देतो, ते कायम शुभ्र ठेवले पाहिजे. 

देवी सरस्वती १४ विद्या ६४ कलांची जननी आहे. तिला संगीत प्रिय आहे. म्हणून हातात वीणा धरली आहे. देवीला आपण आई म्हणतो आणि आई आपल्या मुलांना शिस्त लागावी म्हणून हातात दंड घेते. मात्र देवी शारदेने वीणेचा दंड घेऊन आपले जीवन सुरेल व्हावे, म्हणून प्रेरणा दिली आहे. तिच्याप्रमाणे आपणही आपल्या अस्तित्त्वाने इतरांचे आयुष्य सुरेल केले पाहिजे.

देवी पद्मासना आहे. एक म्हणजे ती शुभ्र कमळावर विराजमान झाली आहे आणि दुसरे म्हणजे ती पद्मासन घालून बसली आहे. ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहूनही स्वच्छ राहते, त्याप्रमाणे सरस्वतीच्या उपासकाने आपल्या पदाला लांछन लागेल, असे वर्तन करता कामा नये. तसेच पद्मासनात बसण्याचा सराव म्हणजे, ज्ञानार्जन करताना आपली बैठक पक्की हवी. पद्मासनात बसून मन आणि देह स्थिर ठेवून संपूर्ण लक्ष अभ्यासात केंद्रीत केले पाहिजे.

ब्रह्मा, विष्णू, महेशही देवी सरस्वतीला वंदन करतात. याचे कारण म्हणजे, देवीच्या एका हातात जपाची माळ आणि दुसऱ्या हातात पोथी आहे. पोथी हे ज्ञानाचे प्रतीक आहे, तर जपमाळ भक्तीचे. त्रिदेवांच्या ठायी शक्ती आहेच, परंतु त्याला भक्ती आणि युक्तीचीही जोड हवी, ती प्रेरणा ते शारदेपासून घेतात.
अशी देवी सरस्वती आपल्याही आयुष्यातील जडत्त्वाचा नायनाट करो, अशी आपण तिच्या चरणी प्रार्थना करावी. आयुष्यात एकवेळ लक्ष्मी प्राप्त झाली नाही, तरी ठीक, परंतु सरस्वतीची आराधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण, विद्वानं सर्वत्र पूज्यते!

हेही वाचा : Navratri 2020: नवरात्रीत अनवाणी का चालतात, जाणून घ्या!

Web Title: Navratri 2020: Arrival today of Goddess Sharade who brings knowledge and brilliance in life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.