जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 24, 2020 12:31 PM2020-11-24T12:31:23+5:302020-11-24T12:32:21+5:30

शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे.

Have you ever experienced the quietest place in the world? - Gaur Gopal Das | जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

'दूर कुठे तरी निघून जावे' असे आपल्या प्रत्येकाला वरचेवर वाटत असते. अशी जागा, जिथे खूप शांतता असेल, कुठलाही त्रास नसेल, कोणाशीही स्पर्धा नसेल, कोणी आपल्याला दुखावणारे नसेल, आयुष्याचा भरभरून आनंद घेता येईल. मात्र, दुदैवाने अशी जागा मनुष्याने शिल्लकच ठेवलेली नाही. पृथ्वी कमी पडते म्हणून की काय, तो चंद्रारवर, मंगळावर जागा विकत घेऊ लागला आहे. परंतु, तिथे तरी अपेक्षित असलेला एकांत गवसणार आहे का? मग तो कुठे मिळेल? जगभरात अशी एकही जागा नाही का, जिथे मन:शांती मिळेल? याबाबत गुरु गौर गोपाल दास आश्वस्थ करतात, अशी एक जागा आहे. कोणती, ती या कथेत सापडेल.

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

एक राजा होता. तो अजातशत्रू होता. शत्रू त्याला पाहून थरथर कापत असत. त्याच्या रयतेवर अनिष्ट आणण्याचे धाडस कोणात्याही सम्राटात नव्हते. सगळी आलबेल होती. सुबत्ता होती. राजाच्या पायाशीदेखील सगळी सुखं लोळण घेत होती. संसारसुखाचीही कमतरता नव्हती. असे सगळे असूनही, राजाचे मन मन:शांतीसाठी व्याकूळ असे. ती कुठे गवसेल, या शोधात तो होता. त्याने एक स्पर्धा आयोजित केली आणि 'मन:शांती' हा विषय चित्रातून अभिव्यक्त करण्याचे आवाहन केले. विजेत्याला भरघोस संपत्तीने  भरलेली धनाची पेटी बक्षिस म्हणून देण्याचेही घोषित केले. देशोदेशिच्या चित्रकारांनी स्पर्धेत भाग घेतला. राजाने जातीने लक्ष घालून सर्व चित्रांची तपासणी केली. या विषयातील तज्ञांचीदेखील मते घेतली. सरतेशेवटी दोन चित्रांची निवड झाली. 

पहिले चित्र, अतिशय सुंदर होते. नावे ठेवायला जागाच नाही. शांतता हा भाव चित्रातील प्रत्येक बारकाव्यातून उमटत होता. सुंदर निसर्ग, उंच पर्वत, कोवळे ऊन, झुळझुळू वाहणारी नदी, नदीच्या काठावर हिरवळ, खुल्या आकाशाखाली पंख पसरवून विहार करणारे मोर, नाजूक सुकोमल फुलांतून गंध प्राशन करणारे मधुकर आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेत बासरीवादनात दंग झालेले श्रीकृष्ण. संगीत ऐकताना देहभान विसरून गेलेल्या गायी, श्वान, पशू-पक्षी. ते चित्र पाहता, राजाचे भान हरखून गेले. मनोमन त्याने चित्रकाराला बक्षिस जाहीरही करून टाकले. परंतु, दुसरे चित्र पाहिल्यानंतरच नाम घोषित करता येणार होते. म्हणून राजाने दुसऱ्या चित्राकडे मोर्चा वळवला. 

दुसरे चित्र पाहत असताना क्षणभरापुर्वीची शांतता क्षणात भंग पावली. मन उद्विग्न झाले. हे चित्र विषयाला अनुसरून नाही, असे म्हणत तो, त्या चित्राच्या निवडीबद्दल तज्ञांना जाब विचारणार, तोच क्षणभर थांबला. त्याने चित्र निरखून पाहिले. रखरखीत डोंगराळ परिसर, निष्पर्ण झाडं, उजाड वस्ती, कुपोषित जनता, घोंगावणारे वादळ, काही क्षणात धुंवाधार पावसाची शक्यता, पावसाच्या पाण्यात वाहून जातील, अशी मोडकळीस आलेली घरे, हे पाहताना राजा कमालीचा अस्वस्थ झाला. त्याचवेळेस त्याचे लक्ष तुटक्या झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या वृद्ध माणसाकडे गेले. त्या वादळी प्रसंगातही त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती. संकट थैमान घालत असतानाही, तो स्थितप्रज्ञ होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची, काळजीची पुसटशी रेषाही नव्हती. त्याला पाहिल्यावर राजाचे व्याकूळ झालेले मन एकाएक शांत झाले. ही शांतता क्षणिक नव्हती. चिरकाल टिकणारी होती. कारण, चित्रातल्या वृद्ध माणसाने आपल्या चेहऱ्यावरील भावांनी शांततेची खरी व्याख्या राजाला न बोलता समजावून सांगितली होती. ती व्याख्या म्हणजे, 

'शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे. शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. मग तुम्ही कितीही विकेंड पिकनिक काढा, मन:शांती लाभणार नाही. बाहेरच्या प्रवासाऐवजी आतला प्रवास करा. शांततेला शोधण्याचा प्रयत्न करा. ती सापडली, अवगत झाली, तर कोणीही बाह्य व्यक्ती, परिस्थिती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. जगातील सर्वात शांत जागा बाहेर नाही, तर तुमच्या मनात आहे. ती शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी बोलू नका. डोळे मिटून स्वतःकडे शांतपणे पहा. स्वतःचे आकलन करा. मी कोण आहे, मला काय आवडते, मी का जगतोय, माझे ध्येय काय, माझं स्वतःवर आणि इतरांवर किती प्रेम आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मन आपोआप शांत होईल. समाजासमोर मिरवणारा खोटा मुखवटा गळून पडेल आणि स्वतःशी नव्याने ओळख होईल. ती ओळखच तुम्हाला मनातला शांत कोपरा दाखवेल. 

हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

Web Title: Have you ever experienced the quietest place in the world? - Gaur Gopal Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.