Diwali 2020 : माय-लेकाच्या नात्याचे वसुबारसेच्या निमित्ताने प्रतीकात्मक पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:17 PM2020-11-08T17:17:32+5:302020-11-08T17:25:53+5:30

Diwali 2020 : आई-लेकराचे नाते अतुल्य असते. आईला मुलांप्रती आणि मुलांना आाईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात.

Diwali 2020: Symbolic worship of My-Lake relationship on the occasion of Vasubaras. | Diwali 2020 : माय-लेकाच्या नात्याचे वसुबारसेच्या निमित्ताने प्रतीकात्मक पूजन

Diwali 2020 : माय-लेकाच्या नात्याचे वसुबारसेच्या निमित्ताने प्रतीकात्मक पूजन

googlenewsNext

गाय आणि तिचे वासरू हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते, ते केवळ अनुपमेय असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. दुसऱ्या कोणाला ते बधत नाही. ओळखत नाही. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी नामदेवांची रचना घेऊन वर्णन केले आहे, 

तू माझी माऊली, मी तुझे वासरू,
नको पान्हा चोरू, पांडुरंगे।
धेनु चरे वनी, वत्स असे घरी, 
चित्त वत्सावरी, ठेवूनि फिरे।

अशी विठ्ठलाची मनधरणी केली आहे. यासारखे अनेक गोवत्स संदर्भ नामदेवांच्या अभंगात येत असतात. जनाबाईदेखील म्हणतात,

मी वत्स माझी गायी, न ये आता करू काई?
मज पाडसाची माय, भक्ति वत्साची ते गाय।।

अशा शब्दात पांडुरंग आणि आपल्यामधील नात्याचे वर्णन केले आहे. ते गाय वासराच दृष्टांत देऊनच. तुकाराम महाराज म्हणतात, 

वत्स पळे धेनु, धावे पाठीलागी,
प्रीतीचा तो अंगी, आविर्भाव।।

अशा शब्दात या नैसर्गिक, अकृत्रिम प्रेमाची थोरवी गायली आहे. ज्ञानदेवांच्या सदाप्रसन्न, तृप्त, शांत व्यक्तिमत्त्वाला वत्स-धेनू हा दृष्टांत अधिक आवडला नसता, तरच नवल. ज्ञानेश्वरीतील गाय वासराचे असंख्य संदर्भ नवनवीन रूपात आपल्या समोर येतात.

नाना गाय चरे डोंगरी, परि चित्त बांधिले वत्स घरी.
वत्सावरूनि धेनूचे, स्नेह राना न वचे।

हेही वाचा : Diwali 2020 : दिवाळीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया

गाय डोंगरात चरत असते, पण तिचे सारे लक्ष गोठ्यातल्या वासरावर असते, त्याप्रमाणे स्थिरपुरुष देहाने फिरत असला तरीही त्याचे चित्त चंचल नसते, असा यथार्थ दृष्टांत ज्ञानदेव देतात. ज्ञानी भक्त आणि देव यांच्यामधील अद्वैत सांगताना वासरू जसे तनमनप्राणाने आपल्या आईलाच ओळखते, त्याच्या या अनन्यगतीमुळे गायीचीही त्याच्यावर तशीच अपार माया असते. तृप्त झाल्यावरही गाय आपल्यापासून दूर जाऊ नये, असे वासराला वाटत राहते. या प्रसंगाचे वर्णन ज्ञानोबा करतात,

वत्स धालया परी, धेनु न वचावी दुरी,
अनन्य प्रीतीची परी, ऐसीच आहे।

देवांची स्थिती तरी गायींपेक्षा वेगळी कुठे होती?

अहो वासरू देखिलियाचि साठी, धेनु खडबडोनि मोहे उठी, 
मग स्नामुखाचिये भेटी, काय पान्हा न ये।।

वासराला पाहून गाय प्रेमाने पटकन उठून उभी राहते. तिला पान्हा फुटतो. तसाच भगवद्गीतेतील अर्जुन साक्षात कामधेनुच्या अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयाला आल्यावर, तो तरी ज्ञानामृत प्यायल्यावाचून कसा वंचित राहील? गीतेतील तत्वज्ञान केवळ अर्जुनसाठी नसून संपूर्ण मनुष्यसृष्टीसाठी आहे. म्हणून आपणही वासरू बनून गीतारुपी तत्वज्ञानाला शरण जावे. 

आई-लेकराचे नाते अतुल्य असते. आईला मुलांप्रती आणि मुलांना आाईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात.

आपणही हे वात्सल्य, संस्कृती, आनंद जपुया आणि दिवाळीच्या शुभेच्छा  हॅपी दीपावली, न म्हणता शुभ दिवाळी म्हणत मराठमोळ्या पद्धतीने साजरी करूया.

हेही वाचा : Diwali 2020 :दिवाळीच्या दिव्यांबरोबरच अध्यात्माचाही ज्ञानदीप लावूया

Web Title: Diwali 2020: Symbolic worship of My-Lake relationship on the occasion of Vasubaras.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी