Celebrate Monday, Awale Navami! | सोमवारी साजरी करा आवळे नवमी; जाणून घ्या नेमकं काय करायचं अन का!

सोमवारी साजरी करा आवळे नवमी; जाणून घ्या नेमकं काय करायचं अन का!

ज्योत्स्ना गाडगीळ 

कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी आवळा नवमी म्हणून ओळखली जाते. यंदा २३ नोव्हेंबर रोजी म्हणजे सोमवारी आवळा नवमी आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर आवळ्याच्या वृक्षावर येऊन वास करतात, म्हणून आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. तसेच, पूजा झाल्यावर आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत बसून सहपरिवार भोजन केले जाते. निसर्गाच्या जवळ नेणारा आणि अक्षय आनंद देणारा हा दिवस अक्षय नवमी म्हणूनही ओळखला जातो. 

आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात. म्हणून पुजेच्या वेळी  'ओम धात्र्ये नम:' असा मंत्र म्हणावा. आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शितलता आपल्या आयुष्यात यावी, म्हणून प्रार्थना करावी. 

हेही वाचा : पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

आपल्या आसपासच्या परिसरात परदेशी झाडांची एवढी गर्दी झाली आहे, की देशी झाड शोधूनही सापडत नाही. म्हणून अशा उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या झाडांची लागवड करावी. त्यांचे पालन पोषण करावे. आवळे नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज रोवता येईल. त्या वृक्षाचा विस्तार लक्षात घेऊन झाड लावावे आणि त्याचा निगराणीदेखील करावी. यथासांग पूजा झाल्यावर आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी आणि दिवेलागण करून, नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी. 

देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाझाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती. तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले. तेव्हापासून आवळा नवमी हे व्रत श्रद्धेने केले जाते.

आयुर्वेदात आवळ्याला अतिशय महत्त्व आहे. ते एक अमृत फळ आहे. अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते. विशेषत: हिवाळ्यात शक्तीवर्धनासाठी आवळ्याचे सरबत, मोरावळा, लोणचे, कँडी खाल्ली जाते. पचनक्रिया उत्तम होण्यासाठी जेवणानंतर रोज आवळा कँडी खावी. प्रवासात मळमळत, गरगरत असेल किंवा तापात तोंडाची चव गेली असेल, तर आवळा सुपारी योग्यप्रकारे काम करते. केसगळतीवर आवळा तेल रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. आवळ्याची आंबट, तुरट चव आणि त्याचा रसरशीतपणा, हिरवा पोपटी रंग सर्वांना आकर्षून घेतो. 

जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते, तेव्हा ब्रह्मदेव कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते. त्यावेळी ब्रह्माजींच्या डोळ्यातून ईश्वरीय भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूंपासूनच आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली, असे म्हटले जाते.

वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना 'वृक्ष पंचवटी' म्हटले जाते.  लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्व वयोगटासाठी आवळा गुणकारक आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हाच आवळे नवमीचा हेतू आहे.  

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

Web Title: Celebrate Monday, Awale Navami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.