बाकी देवांच्या तुलनेत एकट्या बाप्पाचे पोट मोठ्ठे का? जाणून घ्या त्यामागचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:27 PM2021-10-08T17:27:23+5:302021-10-08T17:56:52+5:30

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत.

Is Bappa's stomach bigger than other gods? Find out why ... | बाकी देवांच्या तुलनेत एकट्या बाप्पाचे पोट मोठ्ठे का? जाणून घ्या त्यामागचे कारण...

बाकी देवांच्या तुलनेत एकट्या बाप्पाचे पोट मोठ्ठे का? जाणून घ्या त्यामागचे कारण...

googlenewsNext

९ ऑक्टॉबर, आश्विन मासातील विनायकी चतुर्थी. देवी शारदेची उपासना सुरू असतानातिच्या सुपुत्राची अर्थात गणपती बाप्पाची सेवा करण्याची ही नामी संधी आहे. त्यानिमित्ताने आपण बाप्पाची पूजा करूच. पण ही पूजा करताना तुमच्या मनात कधी एक प्रश्न आलाय का? की हिंदू धर्मातील सगळे देव तंदुरुस्त असताना, एकटा गणपती बाप्पा तुंदिल तनू का? त्यामागचे कारण म्हणजे, आपण सगळे रोज त्याच्याकडे करत असलेली प्रार्थना...!

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

आपल्याला एखादे काम करून घ्यायचे असेल, तर आपण आपल्या लाडक्या व्यक्तीला गळ घालतो. गणपती बाप्पा हे तर सर्वांचेच लाडके दैवत! मग सुख असो, दु:ख असो, तक्रार असो नाहीतर अपराध असो, आपण आपले गाऱ्हाणे त्यालाच जाऊन सांगतो. तोही बिचारा सुपाएवढे कान पसरून भक्तांचे सगळे बोलणे निमुटपणे ऐकून घेतो. एवढा ताण सहन करूनही त्याचा चेहरा कधीच तणावग्रस्त दिसत नाही. याचे कारण, सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना फोलकटे फेकून देते आणि चांगले धान्य जवळ ठेवते, तसेच बाप्पासुद्धा बरे-वाईट सगळे ऐकून घेतो आणि चांगल्या गोष्टी जवळ ठेवून वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. पण तो एक `गुड लिसनर' अर्थात `उत्तम श्रोता' असल्यामुळे आपण सगळे काही त्यालाच जाऊन सांगतो. इथवर ठीक आहे. 

परंतु, आपली चूक कबुल करताना आपण त्याला घातलेली अट महाभयंकर आहे, `देवा, तू आमचा पालक आहेस. आम्ही तुझे बालक आहोत. आई जशी आपल्या मुलांच्या चुका पदरात घेते, तसे तू देखील आमचे कोट्यानु कोटी अन्याय पोटात घे.' बाप्पा तथास्तु म्हणतो आणि सगळ्या गोष्टी पोटात दडवून ठेवतो. 

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, `राम म्हणता राम होईजे...' आपण ज्या दैवताची उपासना करतो, त्याचे गुण आपण आपल्या अंगी बाणले पाहिजेत. केवळ बाप्पाला मोदक आवडतात, म्हणून आपणही चवीने मोदक खायचे, हा एकमेव गुण घ्यायचा नाही. तर, बाप्पासारखे आपल्यालाही उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम लढवय्या आणि जिज्ञासू विद्यार्थी होता आले पाहिजे. 

आपल्याला कोणी काही सांगत असेल, तर ते शांतपणे ऐकून घेता आले पाहिजे. ऐकलेल्या गोष्टी डोक्यात न साठवता, पोटात साठवल्या पाहिजेत. अर्थात त्या गुपित ठेवता आल्या पाहिजेत. देवाचे सूपासारखे कान त्याचे डोक शांत ठेवतात, तसे आपणही आपल्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर फार विचार करत न बसता, अनावश्यक गोष्टी डोक्यातून डिलीट करून चित्त स्थिर ठेवले पाहिजे. बाप्पाचे बारीक डोळे, दूरदृष्टीचे सूचक आहेत. आपल्यालाही दैनंदिन जीवनात आगामी संधी, संकटे यांचा अंदाज घेता आला पाहिजे. बाप्पाला आपल्या सोंडेने चांगल्या-वाईट गोष्टी हुंगूनही ओळखता येतात. त्याप्रमाणे आपल्यालाही परिस्थितीचा ओळखता आली पाहिजे. तो मंगलमूर्ती आहे. त्याला पाहून इतरांना जसा आनंद होतो, तसा आपल्याला पाहून लोकांना आनंद वाटला पाहिजे. आपले अनंत अपराध पोटात घेऊन बाप्पा तुंदिलतनू झाला, तरी युद्धात त्याला कोणीही हरवू शकले नाही. कारण, त्याने कधी युक्तीने तर कधी शक्तीने शत्रूचा पराभव केला. त्याच्याप्रमाणे आपणही शत्रूसमोर केवळ शक्तीप्रदर्शन न करता, स्थलकालानुरूप लढाई जिंकली पाहिजे. त्यासाठी बाप्पा जसा पाशांकुशधारी आहे, तसा आपल्यालाही हाताशी मिळेल त्या साधनाचा प्रसंगी शस्त्राप्रमाणे वापर करून आपला आणि इतरांचा बचाव करता आला पाहिजे. उंदरासारख्या कुरतडणाऱ्या काळ्या कभिन्न वृत्तीवर स्वार होता आले पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन नेतृत्त्व निभावता आले पाहिजे. 

या सगळ्या गोष्टी आत्मसात करता आल्या, तरच आपण बाप्पाचे भक्त म्हणवून घेऊ शकू . मग बाप्पाही न सांगता आपले अनंत अपराध पोटात घेईल आणि मोबदल्यात मोदकाचा गोड गोड प्रसाद देईल. 

गणपती बाप्पा मोऽऽऽरया!

Web Title: Is Bappa's stomach bigger than other gods? Find out why ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ganpatiगणपती