Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 17, 2020 05:42 PM2020-09-17T17:42:29+5:302020-09-17T17:49:44+5:30

Adhik Maas 2020 कोरोनाने २०२० वर्ष गिळंकृत केले. त्यात अनेक कामांना, उद्योगांना खीळ बसली, तरीदेखील मनुष्याने हार न मानता 'पुनश्च हरि ओम' म्हणत कामाला सुरुवात केली. अशातच अधिक मासाचा योग म्हणजे पर्वणीच!

Adhik Maas 2020: Know Religious importance, Astrology behind Adhik Maas or Purushottam Maas  | Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

googlenewsNext
ठळक मुद्देदर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो. मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात अधिक मास येत नाही. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजा पाठ करावेत. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

दरवर्षी पितृपंधरवड्यापाठोपाठ नवरात्र सुरू होते. मात्र, यंदा १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत अधिक मास असणार आहे. त्यालाच `मलमास' किंवा 'पुरुषोत्तम मास' असेही प्रामुख्याने म्हटले जाते. मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे खगोलशास्त्रीय गणित काय ?

काशीनाथ जोशी यांनी `संपूर्ण चातुर्मास' या पुस्तकात संग्रहित केलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी अधिकमास येतो. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी 'अधिक मास' येतो. 

सूर्य वर्षातील १२ राशींपैकी प्रत्येक महिन्यात एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो, त्याला संक्रांत म्हणतात. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षांत १२ संक्रांती होतात. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत १२ महिन्यांत प्रत्येक एका महिन्यात संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की त्यात संक्रांत नसते. अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते. त्या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. जसे, यंदा अश्विन महिना आल्याने अधिक अश्विन मास असे म्हटले जाईल. चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो. मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात अधिक मास येत नाही. पण, फाल्गुनात क्वचित येऊ शकतो.  यावरून आपल्याला पूर्वजांच्या सखोल अभ्यासाचा अंदाज येऊ शकतो. 

अधिक मास अर्थात 'बोनस महिना'. 

कोरोनाने २०२० वर्ष गिळंकृत केले. त्यात अनेक कामांना, उद्योगांना खीळ बसली, तरीदेखील मनुष्याने हार न मानता `पुनश्च हरि ओम' म्हणत कामाला सुरुवात केली. अशातच अधिक मासाचा योग म्हणजे पर्वणीच! नैराश्याने, अपयशाने, आजाराने ग्रासलेल्या जीवाला अधिक मासाच्या निमित्ताने आध्यात्मिक बैठक करण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. 

शाळेत पेपर संपता संपता, परिक्षकांनी १० मिनिटांचा अवधी वाढवून दिला, तर जो आनंद होतो, तोच आनंद अधिक मासातून मिळवण्याचा प्रयत्न करता येईल. हा कालावधी धार्मिक अनुष्ठानासाठी वापरून पुण्यसंचय करता येईल. 

अधिक मासात काय करावे? 

साक्षात भगवान महाविष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील व्यवहार चालणार आहेत, याची नोंद घ्यावी. 

>> हाताने काम आणि मुखाने नाम घेत, सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. 

>> या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजा पाठ करावेत. 

>> स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून अधिक मासात अधिकाधिक स्तोत्रपठण करून सकारात्मकता वाढवावी.

>> अधिक मासात गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा, शुश्रुषा करावी. अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रूजू होते. 

>> मन विषयांमध्ये न गुंतवता, शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली दैनंदिन कामे पार पाडावीत. 

अधिक मासात काय करू नये?

वर म्हटल्याप्रमाणे, हा महिना बोनस मिळाला आहे. त्याचा वापर काटेकोरपणे केला पाहिजे. तरच या अधिक महिन्याची बचत होऊन भविष्यात त्याचे व्याज मिळवता येईल.

>> लग्न, कार्ये, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतीही मंगल कार्ये अधिक मासात करू नयेत. फार तर, या समारंभाचे मुहूर्त या मासात निश्चित करता येतील.

>> गृहखरेदी, वास्तुखरेदी, वाहन खरेदी इ. मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासात करू नये. मात्र, त्यासंबंधी बोलणी या मासात पार पाडता येतील.

>> नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता, आपल्या नेहमीच्या मंदिरातील देवाची किंवा देव्हाऱ्यातील देवाची यथासांग पूजा करावी.

विशेष योग

यंदा लीप वर्ष आणि अधिक मास एकाच वर्षात आले आहेत. हा योग जवळपास १६० वर्षांनी जुळून आला आहे. तसेच, २०३९ मध्ये या योगाची पुनरावृत्ती होईल असे पंचांगात म्हटले आहे. अशा जुळून आलेल्या योगाचे पुण्य पदरात पाडून घेऊया.

Web Title: Adhik Maas 2020: Know Religious importance, Astrology behind Adhik Maas or Purushottam Maas 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.