While performing a surgical strike, Shivaji Maharaj's ideal was in front of the eye | सर्जिकल स्ट्राईक करताना शिवाजी महाराजांचा आदर्श डोळयासमोर होता
सर्जिकल स्ट्राईक करताना शिवाजी महाराजांचा आदर्श डोळयासमोर होता

माजलगाव (बीड ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीचा आदर्श डोळयासमोर ठेवूनच भारतीय सैन्याने उरी येथील सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केला. भारतीय सैन्य यापुढे कोणताही सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी तयार आहे. तसेच राफेल खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला हे साफ चुकीचे असून या कराराने मोठा फायदा झाला असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले.

शहरातील माँ वैष्णवी मंगल कार्यालय येथे छत्रपती संभाजी राजे जन्मोत्सव व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मास्टर जनरल ऑफ दि ऑर्डनेंस तथा उरी सर्जिकल स्ट्राईकचे जनक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन श्री शिवशंभू विचार दर्शनच्या वतीने मंगळवारी (दि. १२ ) सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार आर.टी.देशमुख, उद्घाटक रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात तर प्रमुख पाहुणे डॉ. योगिता होके , माजी सभापती नितीन नाईकनवरे, अच्युतराव लाटे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, दीपक मेंडके, अविनाश बनसोडे, हनुमान कदम, रामराजे रांजवण, लखन सावंत,  राज गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. 

पुढे बोलताना निंभोरकर म्हणाले की, भारतीय सैन्य हे कुठल्या जाती- धर्माचा विचार करत नाही, ते फक्त भारत मातेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावून काम करतात. उरी सर्जिकल स्ट्राईक करतांना सैन्यांसमोर शिवाजी महाराजांचा आदर्श होता. सैन्यांनी रात्रीच 3 वाजल्यानंतरच सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठीची वेळ निवडली होती. सरकाराने पुढाकार घेतल्यामुळेच बालाकोठ मधील सर्जिकल स्ट्राईक करता आली व यात 300ते 350 दहशतवाद्यांचा खात्मा करता आला असल्याचे ते म्हणाले. भारतीय तिन्ही दलाचे सैन्य देशसेवेसाठी कमी पडणार नाही. सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देशातील जनतेने सैन्याचे मनोबल वाढवले. परंतू काही राजकीय नेत्यांनी मात्र स्ट्राईकबाबत उलटेसुलटे विधानं करून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सैन्याचे मनोबल खचते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन मोगरेकर तर सूत्रसंचालन प्रा. रमेश गटकळ यांनी केले. आभार योगिता होके यांनी व्यक्त केले. 


Web Title: While performing a surgical strike, Shivaji Maharaj's ideal was in front of the eye
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.