Water supply with 5 tankers in Ambajogai taluka | अंबाजोगाई तालुक्यात ३५ टँकरने पाणीपुरवठा
अंबाजोगाई तालुक्यात ३५ टँकरने पाणीपुरवठा

ठळक मुद्देटँकरची मागणी वाढली । ४३ गावांत १०३ विहिरी व विंधन विहीर अधिग्रहित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४३ गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. मात्र, दिवसेंदिवस जलस्त्रोत निकामी होऊ लागल्याने गावोगावी टँकरची मागणी वाढू लागली आहे.
पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्याप अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेती अत्यंत हलाखीची झाली असून खरिपाची पिके पावसाअभावी गेली. आता रबीही नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. वर्षभरापासून पाऊस नसल्याने ठिकठिकाणचे जलस्त्रोत दिवसेंदिवस निकामी होत चालले आहेत. गावोगावी टँकरची मागणी प्रशासनाकडे वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सध्या ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून वाडी, वस्त्या, तांडे येथे पाणीपुरवठा सुरू आहे. तर ४३ गावांमध्ये १०३ विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या अधिग्रहण केलेल्या विहिरी व इंधन विहिरींचे पाणी दरदिवशी कमी होत चालले आहे. याचा फटका गावोगावच्या ग्रामस्थांना बसू लागला आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ गावोगावच्या महिला नागरिकांवर आली आहे. मिळेल तेथून पाणी मिळवणे हा एकमेव उपक्रम सध्या ग्रामस्थ राबवित आहेत.
शहरी भागातही पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा धरणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी न आल्याने धरण मृतसाठ्याकडे वाटचाल करीत आहे. तर अंबाजोगाई शहरालगत असलेला काळवटी साठवण तलावही यावर्षी भरला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा उपयोग पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावात पाणीच न आल्याने आहे हा पाणीसाठा जेमतेम दोन ते अडीच महिने अर्ध्या गावासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशी भीषण स्थिती शहरातही निर्माण झाली आहे.
एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचा सामना तालुक्याला तीव्रतेने करावा लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण १०४ गावे आहेत. यापैकी ४० गावांमध्ये टँकर तर ४३ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

Web Title: Water supply with 5 tankers in Ambajogai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.