'Use of my name in Beed is misleading voters', Udayan Raje circular release on social media | 'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं पत्रक जारी
'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं पत्रक जारी

मुंबई - खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रितम मुंडेंच्या प्रचारासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर, छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे या दोन्ही राजांचा प्रितम मुंडे यांना पाठींबा असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यातील श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठाणनेही प्रितम मुंडेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांनी पत्रक काढून आपला कुठल्याही भाजपा-सेना उमेदवारास पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे. 

राजकारण आणि जातीची समीकरणे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील राजकारणा आजपर्यंत पुढे चालत आले आहे. बीडमधील प्रत्येक निवडणूक जातीच्या गणितांवर अवलंबून असते. यातून लोकसभा निवडणूकही सुटली नाही. बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा-वंजारी वाद होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवार जातीची समीकरणे जुळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांना प्रचारासाठी बोलविले आहे. त्यामुळे पंकजा यांनी मराठा मतांसाठी प्रचारात संभाजी राजेच्या रुपाने मराठा कार्ड वापरल्याची चर्चा बीडमध्ये रंगत आहे. मुंडे कुटुंबीयांचे आणि आमचे अनेक दिवसांचे संबंध आहेत. माझ्या शिव-शाहू दौऱ्याच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याला भगवान गडावर बोलवले होते. तसेच मृत्युपूर्वी त्यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ घातली होती. त्यामुळे प्रितम यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी मी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले होते. मात्र, संभाजीराजेंच्या भेटीनंतर उदयनराजेंचाही प्रितम यांना पाठिंबा मिळाल्याची चर्चा होती. मात्र, उदयनराजेंनी एक पत्रक काढून ही चर्चा खोटी ठरवली आहे. बीड मतदारसंघात माझ्या नावाचा वापर करुन दिशाभूल करण्यात येत असल्याचे उदयनराजेंनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. 

बीडमध्ये मराठा नेते विनायक मेटे यांनी आधीच पंकजा मुंडे आणि भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपसोबत पण बीडमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार, असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा मते भाजपविरोधी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठीच पंकजा यांनी संभाजी राजेंना बीडमध्ये आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संभाजी राजे यांना बोलवून पंकजा यांनी मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने संभाजी राजे यांना राज्यसभेवर घेतले आहे. मी राष्ट्रपती स्विकृत खासदार असलो तरी भाजपच्या मदतीमुळे राज्यसभेवर आहे. त्यामुळे सहाजिकच मोदी पुन्हा सत्तेवर यावे असं आपल्या वाटत असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. 


  
 


Web Title: 'Use of my name in Beed is misleading voters', Udayan Raje circular release on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.