three friends died in accident who go to exercise on the highway for dream of soldier | व्यायाम करताना तिघा मित्रांवर काळाचा घाला; सैन्यात भरतीचे स्वप्न राहिले अधुरे
व्यायाम करताना तिघा मित्रांवर काळाचा घाला; सैन्यात भरतीचे स्वप्न राहिले अधुरे

ठळक मुद्देगावातील सैन्यात असलेल्या तरुणांकडून देशसेवेसाठी प्रेरित होती दोघेजण एकाच वर्गात शिक्षण घेत होती

गेवराई (बीड ) : देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून महामार्गालगत व्यायाम करण्यासाठी जात असताना एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २० ) पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील गढी जवळ घडलेल्या या अपघातातील मृत विद्यार्थी तळेवाडी येथील रहिवासी होते. 

सुनिल प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) व अभिषेक भगवान जाधव (१४) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. जय भवानी हायस्कूल गढी येथे शिक्षण घेत होती. आज पहाटे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण - विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांनाही पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांसह ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती समजताच तळेवाडी गावावर शोककळा पसरली असून गावात एकही चूल पेटली नाही.

देशसेवेचे होते स्वप्न 

गावातील काही तरुण सैन्यात भरती आहेत. ते सुट्ट्यात गावी आले असता तिघेही त्यांना आम्हाला सैन्यात भरती व्हायचे आहे, देशसेवा करयाची आहे असे म्हणत. यासाठीच ते व्यायामाचा नियमित सराव करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तिघांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून पालक मोलमजुरी करतात. मृतांमधील अभिषेक आणि सुनील एकाच वर्गात होती तर तुकाराम त्यांच्यापेक्षा मोठा होता. 


Web Title: three friends died in accident who go to exercise on the highway for dream of soldier
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.