नवरात्र महोत्सवासाठी मंदिरे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:20 AM2019-09-23T00:20:07+5:302019-09-23T00:20:22+5:30

प्रामुख्याने नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू असून शक्तिपीठावरची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Temples ready for Navratri festival | नवरात्र महोत्सवासाठी मंदिरे सज्ज

नवरात्र महोत्सवासाठी मंदिरे सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : तालुक्यात प्रामुख्याने नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू असून शक्तिपीठावरची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील कालिका देवी संस्थानवर सालाबाद प्रमाणे यंदाही महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भागवत कथेबरोबर श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होणार असून, नित्य षोडशोपचार पूजा, घटस्थापना, महाआरती, धरणे प्रवचनादी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
रायमोहा येथे दगडवाडीजवळ प्रतीमोहटा म्हणून नावारूपाला आलेल्या डोंगर देवी संस्थांनवर नामवंत कीर्तनकारांना निमंत्रित करून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शिवाय शहरापासून अगदी दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदुवासिनी संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
कालिका देवी संस्थान हे सिंदफणा नदीकाठी आहे. विश्वस्तांनी मोठ्या परिश्रमाने तेथील हेमाडपंथी मंदिराचे त्याचे मोठ्या स्वरूपात विस्तारीकरण केले आहे. या देवीचा मोठा भक्त परिवार असून, एक जाज्वल्य स्थान मानले जाते. नवसपूर्ती म्हणून महिला भाविक मोठ्या संख्येने धरणे धरून उपवास करीत असतात. येणाऱ्या भाविकांसह मंदिरात धरणेकरूंची सर्वतोपरी व्यवस्था व्हावी, ही गोष्ट केंद्रस्थानी मानून विश्वस्थ मंडळी गेली पंधरा दिवसांपासून परिश्रम घेत आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई, मंडपासह, स्वच्छता, निवास व्यवस्था, चहा पाणी, फराळाची व्यवस्था भक्तांच्या सहभागातून केली जात असते. हे सर्व करताना नवरात्रात नवविध भक्ति घडावी याकडेही प्रकर्षाने लक्ष दिले जाते.
भागवताचार्या अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या वाणीतून भागवत कथा आयोजीत करण्यात आली आहे. संगीत कथेबरोबर सकाळी काकडा भजन, विष्णुसहस्र नाम, कालिका पुराण, होम हवन, अनुष्ठानासह ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण व प्रवचन होणार आहेत. व्यासपीठ चालकाची धुरा विजयकुमार गाडेकर पाटील व भगवान गुरुजी सांभाळणार आहेत. किमान शंभर वाचक सहभागी होतील असा प्रयास आहे.
प्रवचन सेवा ही बिदागी विरहित असते. त्यासाठी भीमाबाई डोंगरे, शालिनीताई देशपांडे (पुणे), गोविंद पाटील, चंद्रकांत थोरात, विनायक महाराज अष्टेकर (औरंगाबाद), विजयकुमार गाडेकर हे आपली सेवा समर्पित करणार आहे. या संपूर्ण नवरात्र महोत्सवाचा समारोप धाकट्या अलंकापुरीचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
डोंगरदेवी संस्थानवर महाराष्ट्रातील कीर्तनकारांना निमंत्रित केले आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कालिकादेवी विश्वस्त अध्यक्ष रोहीदास पाटील, सचिव बापूराव गाडेकर व सदस्यांनी केले आहे.

Web Title: Temples ready for Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.