Teacher's interest in education created in the students | शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली शिक्षणाची आवड
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली शिक्षणाची आवड

दीपक नाईकवाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील डोंगराळ भागातील नागझरी येथील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेची २०१४ पर्यंत दयनीय अवस्था झालेली होती. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडणीच्या कामासाठी जात असल्याने शाळेतील ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी स्थलांतरीत व्हायचे. मात्र या शाळेच्या मुख्याध्यापकपदाचा पदभार सुंदर डोईफोडे यांनी पाच वर्षांपूर्वी स्वीकारल्यानंतर लोकवर्गणीतून शाळेचे रंगरु प बदलत शाळेच्या भिंती बोलक्या केल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतरही शुन्यावर आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून शाळेस नावलौकिक मिळविला. आज या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात एकुण १९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये १०९ मुली तर ८८ मुलांचा समावेश आहे. तालुक्यातील २५ आयएसओ मानांकन प्राप्त शाळामध्ये नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे.
मुख्याध्यापक सुंदर डोईफोडे यांनी सांगितले की, शाळेचा पदभार स्वीकारल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर ९० टक्के होते. त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांना धड निट वाचता ही येत नव्हते. लोकसहभागातून चार लाख रु पये जमा करून शाळा ‘इलर्निंग’ केली. शाळेत दोन प्रोजेक्टर, एलइडी टिव्ही, आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा कंटाळा येऊ नये म्हणून खेळाच्या माध्यमातून व कथाकथनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली त्यांना वाचता यावे यासाठी दिडशे उजळणीचे पुस्तक घेऊन जात त्यांना वाचण्यास शिकवल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.
पहिली ते आठवी वर्गांसाठी एस. एस. कोरसाळे, ए. एन. जाधवर, सी. डी. तांबारे, एस. एस. लोंढे, टी. वाय. पाटील व मुख्याध्यापक सुंदर डोईफोडे या शिक्षकांचा समावेश आहे. २०१६ मध्ये नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेस आयएसओ मानांकनचा दर्जा मिळाला आहे. या यशात या शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.


Web Title: Teacher's interest in education created in the students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.